पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या तिरंग्यावर केलेल्या स्वाक्षरीमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून मोदी यांनी तिरंग्याच्या नियमावलीचा भंग केला असल्याची टीका करण्यात आली. शेफ विकास खन्ना यांच्यामार्फत भारताचा राष्ट्रध्वज अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना देण्यात येणार आहे. मोदी यांनी राष्ट्रध्वजावर केलेल्या स्वाक्षरीचा मुद्दा समाज माध्यमांनीही उचलून धरला होता.
पंतप्रधान मोदी यांची गुरुवारी रात्री ‘फॉच्र्युन’च्या ५०० मुख्याधिकाऱ्यांसमवेत रात्री बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खन्ना यांनी मोदी यांच्या जेवणाचे खाद्यपदार्थ ठरविले होते. त्याच कार्यक्रमात मोदी यांच्या स्वाक्षरीचा तिरंगाही खन्ना यांनी ठेवला होता. मात्र, त्यामुळे ध्वजाच्या संहितेचा भंग झाला आहे किंवा नाही, यासंबंधी वादंग निर्माण झाल्यामुळे हा तिरंगा तेथून अन्यत्र नेण्यात आला. भारतीय ध्वजसंहिता २००२ नुसार, भारताच्या राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहिण्यात आल्यास त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अनादर होतो.
दरम्यान, पंतप्रधानांनी राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी केल्यामुळे भारतीय दंडविधानानुसार गुन्हा ठरतो काय, असा प्रश्न विचारला असता, आम्ही भाजपसारखे नाही. आम्ही पंतप्रधानांच्या कार्यालयाचा आदर राखतो, असे उत्तर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिले. त्याच वेळी पंतप्रधानांनीही यात लक्ष घालून राष्ट्रध्वजाचा आदर राखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशीही सूचना त्यांनी केली. तुम्ही कितीही उच्चपदी असलात तरीही राष्ट्रध्वज तुमच्याही पेक्षा उच्च आहे आणि हे तुम्हाला समजले पाहिजे, असे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.
ध्वजसंहिता २००२ मधील परिच्छेद २.१ व उप परिच्छेद ६ आणि परिच्छेद ३.२८ पंतप्रधानांनी वाचले आहेत काय, अशी विचारणा करून त्या परिच्छेदांमध्ये राष्ट्रध्वजावर काही लिहिणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यासारखे असून यासंबंधी २००३ मध्ये मंजूर केलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार, तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, याकडे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी लक्ष वेधले.

 

‘काँग्रेसकडून अनावश्यक वादंग’
नवी दिल्ली- दरम्यान, ‘अनावश्यक वादंग’ निर्माण केल्याबद्दल भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी केल्याप्रकरणी त्यासंदर्भात अनावश्यक आणि अयोग्य शेरेबाजी करून काँग्रेस विनाकारण वादंग निर्माण करीत आहे, असे भाजपने म्हटले आहे.
अशा प्रकारे अस्तित्वात नसलेले मुद्दे उकरून काढून काँग्रेस दयनीय होत आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी केली. काँग्रेसचे संपूर्ण नेतृत्व परिषदेला उपस्थित राहण्याच्या नावाखाली परदेशात सुट्टय़ा घालवीत असताना हा मुद्दा झाकून ठेवण्यासाठी ते तसे करीत आहेत, असा आरोप राव यांनी केला.

मोदींच्या मेजवानीत गुजराती ढोकळा, काश्मिरी काहवा..
न्यूयॉर्क, – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडय़ा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मेजवानीत भारतातील विविध भागांच्या खाद्यपदार्थाचा समावेश होता. त्यामध्ये शेवई रोल, गुजराती ढोकळा, काश्मिरी काहवा, पनीर टिक्का, मिझोरामच्या काळ्या तांदळाची खिचडी, तिखट शेव, आदी खाद्यपदार्थ होते.
शेफ विकास खन्ना यांनी ‘फॉच्र्युन’च्या यादीतील ५०० कंपन्यांशी संबंधित ५०हून अधिक मुख्याधिकाऱ्यांसाठी २६ हून अधिक चविष्ट खाद्यपदार्थ तयार केले होते. गुजरातपासून प्रेरणादायक मक्याचा ढोकळा, नारळाची चटणी, कोल्हापुरी मिरची ठेचा, अशा खाद्यपदार्थाची रेलचेल होती. भारतीय उत्सवांपासून प्रेरणा घेऊन विविध खाद्यपदार्थ तयार करण्यात आले होते. अर्थात सर्व खाद्यपदार्थ पूर्णपणे भारत केंद्रित होते, असे खन्ना यांनी सांगितले.

मोदी-ओबामा यांच्यात सोमवारी बैठक
न्यूयॉर्क- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेणार आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सभेनंतर हे दोन्ही नेते विविध विषयांवर चर्चा करणार आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. अमेरिका-भारत दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच, आशियाई आणि जागतिक पातळीवर आर्थिक, व्यापार आणि सुरक्षा या विभागांमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन ऱ्होडस यांनी सांगितले. ओबामा यांच्या जानेवारीतील ऐतिहासिक भारत दौऱ्यापासून या दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी चर्चेला सुरुवात झाली होती. मोदी बुधवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले असून ते शनिवारी सिलिकॉन व्हॅलीला भेट देणार आहेत. तसेच, २७ सप्टेंबर रोजी ते १८ हजार भारतीय अमेरिकन नागरिकांसमोर भाषण करणार आहेत.