‘…तर तुम्हाला हा प्रकाश दिसेल’; ईशान्य भारताचा संदर्भ देत मोदींचा काँग्रेसवर निशाणा

संसदेतील भाषणात मोदींनी बोडोलँड कराराबद्दल केलं भाष्य

मोदींचा विरोधकांवर निशाणा

बोडोलँड करारानंतर ईशान्य भारतामध्ये खऱ्या अर्थाने सकाळ झाली, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. तसेच ‘तुमचे चष्मे काढले तर तुम्हाला हा प्रकाश दिसेल,’ असा टोलाही मोदींनी काँग्रेस आणि मित्रपक्षांना नाव न घेता लगावला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधानांनी लोकसभेत निवदेन केलं. त्यावेळी त्यांनी बोडोलँड प्रकरणावरुन विरोधकांचा समाचार घेतला.

बोडोलँडबद्दल काय म्हणाले मोदी…

केंद्र सरकार करत असलेल्या वेगवेगळ्या करारांची माहिती देताना मोदींनी बोडोलँड कराराबद्दल भाष्य केलं. “देशात अनेक प्रयोग झाले आणि आताही अनेक प्रयोग होत आहेत. जे काही केलं ते राजकीय हेतूने आणि अर्ध्या इच्छाशक्तीने करण्यात आलं. कागदावर अनेक करार झाले. अनेकदा फोटोही छापून आले. स्वत:चं कौतुकही करुन घेण्यात आलं. मात्र इतक्या वर्षामध्ये बोडो वाद उत्तर मिळालं नाही,” असा टोला मोदींनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला.

बोडोलँड कराराने काय होणार?

बोडोलँड करार का महत्वाचा होता याबद्दलही मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. “चार हजारहून अधिक निर्दोष लोकांची हत्या झाली. अनेक प्रकारचे आजार पसरले. समाजिक जिवनाला संकटात टाकणाऱ्या अनेक घटना घडल्या. मात्र आता झालेला सामंजस्य करार हा ईशान्य भारताबरोबर सर्व देशाला राष्ट्रातील शांतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना संदेश देणारी घटना आहे. हत्याराने हा प्रश्न सोडावयला बघणारे सर्व गट एकत्र आले आहेत. भूमिगत असलेल्यांचाही यामध्ये समावेश आहे. यानंतर बोडो प्रश्नांशी संबंधित कोणतीही मागणी शिल्लक राहिलेली नाही असं या ठरावामध्ये नमूद करण्यात आलं आहे,” असं मोदी म्हणाले. “ईशान्य भारतात सर्वात आधी सूर्य उगवायचा मात्र सकाळ होत नव्हती. मात्र आज तिथे नवीन सकाळ झाली आहे. हा प्रकाश तुम्ही तुमचे चष्मे बदलाल तेव्हा तुम्हाला दिसेल,” असा टोमणा मोदींनी विरोधकांना लगावला.

काय आहे बोडोलँड करार

केंद्र सरकारला ईशान्य भारतातील दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने जवळपास ५० वर्षांपासूनचा बोडोलँड वाद संपुष्टात आण्यात यश आले आहे. २७ जानेवारी (सोमवार) रोजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार, आसाम सरकार व बोडो माओवादी संघटना यांच्यात एक महत्वपूर्ण करार झाला आहे. या करारानुसार ३० जानेवारी नॅशनल डेमोक्रेटीक फ्रंट ऑफ बोडोलँड(एनडीएफबी) या संघटनेच्या विविध गटांमधील तब्बल १ हजार ६१५ माओवाद्यांनी गुवाहटी येथील एका कार्यक्रमात आत्मसमर्पण करत आपली शस्त्रे खाली ठेवली. या कार्यक्रमास आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची उपस्थिती होती.

साधारण पाच दशकांपासून सुरू असलेल्या बोडोलँड वादामुळे आतापर्यंत तब्बल अडीच हजारांपेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. २७ वर्षांमधील हा तिसरा आसाम करारा आहे. हा वाद संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकार अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. अमित शाह यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर या प्रयत्नाना वेग आला होता. अखेर दोन दिवसांपूर्वी हा करार झाल्याने आता आसाममधील नागरिकांचा विकासातील मोठा अडसर दूर झाला आहे. येथील नागरिकांना हात मुक्त जीवन जगता येईल, असं गृहमंत्री शाह यांनी यावेळी म्हटले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm modi slams congress over bodo land scsg

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या