scorecardresearch

Video: The Kashmir Files वरुन मोदींनी सुनावलं; म्हणाले, “ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी…”

या चित्रपटाला विरोध करणारे लोक इतर वेळेस अभिव्यक्ती स्वासंत्र्याचे झेंडे घेऊन मिरवत असतात असा टोलाही मोदींनी लगावलाय.

PM Modi on The Kashmir Files
भाजपा खासदारांसमोर बोलताना मोदींनी व्यक्त केलं मत (फाइल फोटो)

देशभरामध्ये सध्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन सोशल मीडियावरही वाद सुरु आहेत. विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगली कमाई केलीय. सोशल नेटवर्किंगवर सध्या ‘द काश्मिर फाइल्स’वरुन चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहेत. अनेकांनी या चित्रपटाबद्दल सकारात्मक मतं व्यक्त केली आहेत. तर काहींनी या चित्रपटाच्या माध्यमातून दोन समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप केलेत. दोन्ही बाजूने या चित्रपटाबद्दल बोललं जात असतं तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई सुरु ठेवलीय हे सुद्धा विशेष आहे. या चित्रपटावरुन मतमतांतरे असतानाच आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

“ती संपूर्ण जमात…”
दिल्लीमध्ये आज (१५ मार्च २०२२ रोजी) पार पडलेल्या भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी सत्य गोष्टी समोर आल्या पाहिजेत हे सांगताना ‘द कश्मीर फाइल्स’ आणि त्याला होणाऱ्या विरोधाचं उदाहरण दिलं. मोदींनी या चित्रपटाला विरोध करणारे लोक इतर वेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन मिरवत असतात असा टोलाही लगावला. “तुम्ही सध्या पाहिलं असेल की ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. जे लोक नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन फिरतात, ती पूर्ण जमात मागील पाच-सहा दिवसांपासून खवळलेली आहे,” असा टोला मोदींनी लगावला आहे.

नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”

“सत्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न…”
“तथ्य आणि कला म्हणून या चित्रपटाचे विवेचन करण्याऐवजी त्याचं श्रेय हेरावून घेण्यासाठी एक मोहीम सुरु करण्यात आलीय. तुम्ही पाहिलं असेल, यासाठी एक पूर्ण इकोसिस्टीम काम करतेय. सत्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय,” असं पंतप्रधान या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले.

“सत्य वाटलं ते सादर केलं…”
तसेच पुढे बोलताना पंतप्रधानांनी, “त्याला (निर्माता, दिग्दर्शकाला) जे सत्य वाटलं ते त्याने सादर करण्याचा प्रयत्न केला. पण त्या सत्याला न समजण्याची तयारी, ना स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे. उलट जगाने हा (चित्रपट) पाहू नये असे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या पद्धतीचे षडयंत्र मागील पाच-सहा दिवसांपासून सुरु आहे,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> विश्लेषण : चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे काय होतं? तिकिटांचे दर कमी होतात का?; फायदा कोणाला होतो?

“त्यांना कोणी नाही म्हटलंय?”
“माझा विषय काही चित्रपट नाहीय. माझा विषय आहे की, जे सत्य आहे ते देशाच्या हितासाठी समोर आणलं पाहिजे. त्या सत्याचे अनेक पैलू असू शकतात. एखाद्याला एखादी गोष्ट दिसते तर एखाद्या दुसरी गोष्ट दिसते. ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी आपला दुसरा चित्रपट बनवावा. त्यांना कोणी नाही म्हटलंय?,” असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केलाय. यानंतर उपस्थित खासदारांनी टाळ्या वाजवून मोदींच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला.

“विरोध करणारे हैराण झालेत…”
“मात्र ते (चित्रपटाला विरोध करणारे) हैराण झालेत की जे सत्य एवढ्या वर्ष दाबून ठेवलं ते तथ्यांच्या आधारे बाहेर आणलं गेलं, कोणीतरी मेहनत करुन ते बाहेर आणलं जात आहे तर ते थांबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत,” असंही मोदींनी खासदारांशी संवाद साधताना म्हटलंय.

असे चित्रपट बनायला हवेत…
पंतप्रधानांनी हा चित्रपट फार उत्तम असल्याचं सांगितलं. तसेच अशाप्रकारचे आणखी चित्रपट निर्माण केले पाहिजेत अशी इच्छाही पंतप्रधानांनी बोलून दाखवली. “द कश्मीर फाइल्स हा फार चांगला चित्रपट आहे. तुम्ही सर्वांनी तो पाहिला पाहिजे. असे चित्रपट आणखी बनले पाहिजेत. अशा चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे,” असं पंतप्रधानांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं.

मोदींची भेट
१२ मार्च रोजी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, चित्रटाचे निर्माते अभिषेक यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळीही मोदींची चित्रपटाचं कौतुक केलं होतं आणि चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm modi slams those who oppose the kashmir files film says truth had been presented in movie scsg

ताज्या बातम्या