पीटीआय, नवी दिल्ली

‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या वागणुकीबद्दल पश्चिम बंगालमधील सुजाण जनता तृणमूल काँग्रेसला कधीच माफ करणार नाही’, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. एका महिला आदिवासी नेत्याचा आणि देशाच्या राष्ट्रपतींचा हा अपमान असल्याचेही ते म्हणाले.

पश्चिम बंगालमधील बगडोगरा विमानतळावर शनिवारी आंतरराष्ट्रीय आदिवासी परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुख्यमंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणताही मंत्री आपले स्वागत करण्यासाठी न आल्याबद्दल दु:ख व्यक्त केले होते. तसेच आदिवासी संथाल समुदायाच्या परिषदेचे ठिकाण बदलल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतींवर भाजपच्या सल्ल्यानुसार बोलत असल्याचा आरोप केला होता.

राजधानी दिल्लीत ‘दिल्ली मेट्रो’च्या दोन नवीन मार्गिकांचे उद्घाटन आणि इतर प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाली. या वेळी मोदींना राष्ट्रपतींबाबत घडलेल्या प्रकारावरून तृणमूल काँग्रेसवर टीका केली. तृणमूल सरकारच्या कृतीमुळे केवळ आदिवासी समाजाच्या कार्यक्रमाचे गैरव्यवस्थापन झाले नाही, तर हा राष्ट्रपती, संविधान आणि देशाच्या लोकशाही परंपरेचा अपमान आहे. राष्ट्रपती मुर्मू संथाल आदिवासी परंपरेचा गौरव करणार्‍या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी बंगालला गेल्या होत्या. मात्र, तृणमूल सरकारने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा मार्ग निवडला, असे मोदी म्हणाले.

आज देश आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहे. परंतु काल तृणमूल सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा घोर अपमान केला, हे खूप गंभीर आहे. हा राष्ट्रपती, संविधान आणि देशाच्या लोकशाही परंपरेचाही अपमान आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

राष्ट्रपतींचा अपमान करण्याची संस्कृती भाजपची आहे. आम्हाला राष्ट्रपती आणि भारतीय संविधानाबद्दल पूर्ण आदर आहे. संविधानाला आम्ही आमची आई मानतो. कार्यक्रमाच्या गैरव्यवस्थापनाबद्दल आम्हाला दोष देऊ नका. – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल