पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या स्लोव्हाकियाच्या अधिकृत दौऱ्यावर असून, १९९३ मध्ये स्लोव्हाकिया स्वतंत्र झाल्यानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ऐतिहासिक भेट ठरली आहे. या दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोव्हाकिया यांनी आपल्या द्विपक्षीय संबंधांना एक पाऊल पुढे नेत ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप’ सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली, तसेच त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले; जे फिको यांनी जाहीरपणे स्वीकारले आहे.
ऐतिहासिक स्वागत आणि द्विपक्षीय चर्चा
स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लाव्हा येथील ऐतिहासिक ‘ब्रातिस्लाव्हा कॅसल’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे औपचारिक आणि पारंपरिक स्वागत करण्यात आले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडली. संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजचा दिवस आमच्या संबंधांमधील एक ऐतिहासिक क्षण आहे. दोन्ही देशांनी परस्पर हित आणि मैत्रीचा विचार करून संबंधांना नव्या उंचीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा दोन्ही देशांसाठी ‘विन-विन’ निर्णय आहे.”
सहकार्याची नवी क्षेत्रे आणि स्वाक्षरी झालेले करार
दोन्ही देशांच्या प्रमुखांनी व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान, अंतराळ, अणुऊर्जा, शिक्षण आणि संस्कृती यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या बैठकीतील महत्त्वाच्या करारांची माहिती दिली.
डिजिटल तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा, पोस्ट-क्वांटम तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक सहकार्य, अणुऊर्जा आणि ऑडिओ-व्हिज्युअल निर्मिती या क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये करार आणि सामंजस्य करार झाले आहेत. कुशल कामगार आणि व्यावसायिकांना दोन्ही देशांत रोजगाराच्या संधी सुलभ करण्यासाठी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय, लवकरच ‘सामाजिक सुरक्षा’ करारालाही अंतिम रूप दिले जाईल, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
जागतिक मुद्दे आणि भारत-ईयू मुक्त व्यापार करार
पंतप्रधान मोदी आणि रॉबर्ट फिको यांनी संयुक्त राष्ट्रांमधील सुधारणांसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. “सर्व वाद आणि तणाव शांततापूर्ण मार्गाने सोडवले जावेत, यावर आमचे एकमत आहे,” असे मोदींनी स्पष्ट केले. दरम्यान, स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी भारत आणि युरोपीय यूनियन दरम्यानच्या मुक्त व्यापार कराराचे जोरदार कौतुक केले. याला त्यांनी आजवरचा अत्यंत महत्त्वाकांक्षी करार म्हटले असून, स्लोव्हाकिया या कराराच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.
फ्रान्स आणि जी-७ शिखर परिषद
स्लोव्हाकियाला येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी शनिवारी फ्रान्समधील नीस येथे दाखल झाले होते, जिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली आणि ‘भारत इनोव्हेट्स’चे उद्घाटन केले. स्लोव्हाकियाचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी मंगळवारी पुन्हा फ्रान्सला रवाना होतील, जेथे ते १६ आणि १७ जून रोजी इव्हियन येथे होणाऱ्या ‘जी-७’शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.
