PM Narendra Modi speaks to Flydubai pilot Captain Smit Machhar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी फ्लायदुबई विमानाचे भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. दुबईहून इस्रायलची राजधानी तेल अवीवला जात असलेल्या फ्लायदुबईच्या विमानातील घातपाताचा प्रयत्न स्मित मच्छार यांनी धाडसाने उधळून लावला होता. यामुळे विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचले. यानंतर मच्छार यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरील संभाषणादरम्यान जखमी असलेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या शौर्याची प्रशंसा केली. तसेच ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी सदिच्छा दिल्या, अशी माहिती समोर येत आहे.
‘भारतीय प्राण घेणारे नाहीत तर वाचविणारे’
पंतप्रधान मोदींच्या संभाषणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ते सुरुवातीला कॅप्टन स्मित मच्छार यांच्या प्रकृतीची विचारपूस करतात. त्यानंतर ते म्हणतात, संपूर्ण देश तुम्ही लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहे. महामृत्यूंजयचा जाप सुरू आहे. तुमची हिंमत, धैर्य आणि चाणाक्ष वृत्तीमुळे अवघ्या काही सेकंदात घेतलेल्या निर्णयामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले. तुमच्यामुळे आज संपूर्ण देश हे अभिमानाने सांगू शकतो की, “आम्ही भारतीय प्राण घेणारे नाही तर प्राण वाचविणारे लोक आहोत.”
“तुम्ही शरीरावर इतके घाव सोसले, स्वतः मृत्यूशी झुंज दिली, तरीही जीवाची पर्वा न करता सर्व प्रवाशांच्या जीवाची काळजी घेतली. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही १४० कोटी भारतीयांची मान उंचावली. यासाठी मी हृदयापासून आपले धन्यवाद मानतो”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.
#WATCH | PM Modi speaks with Flydubai Captain Smit Machchhar through a video call and praises his courage, presence of mind and composure in how he saved many lives
— ANI (@ANI) October 2, 2026
The PM says to Captain Smit, "The whole country is praying for you. Maha Mrityunjay Jaap is being done for you and… pic.twitter.com/TCj3NDqASp
स्मित मच्छार काय म्हणाले?
या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी स्मित मच्छार यांना त्यांचे अनुभव कथन करण्याची विनंती केली. यावेळी स्मित मच्छार म्हणाले, “तुम्ही माझ्याबद्दल जे उद्गार काढले, त्याबद्दल गर्व वाटतो. मी विमानात असताना जेव्हा हल्ला झाला, तेव्हा काही क्षणासाठी वाटले की सगळे संपले. पण मी जर त्यावेळी उठलो नसतो तर सर्व काही संपले असते. मी १७ वर्षांपासून वैमानिक आहे. ११ वर्षांपासून कॅप्टन म्हणून काम करतोय. डोळे बंद करूनही मला विमानात काय चाललंय, हे कळते. मी जेव्हा कॉकपिटमध्ये खाली कोसळलो होतो, तेव्हा विमान वेगाने खाली जात असल्याचे मला जाणवले. जर मी तेव्हा दरवाजा उघडला नसता तर अनर्थ घडला असता. दरवाजा उघडल्यानंतर सर्व आत आले आणि परिस्थिती नियंत्रणात आली.
बुधवारी ३० सप्टेंबर रोजी फ्लायदुबईच्या विमानात सह-वैमानिकाने स्मित मच्छार यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र मच्छार यांनी मोठ्या धाडसाने परिस्थितीचा सामना केला. ज्यामुळे फ्लायदुबईच्या विमानाचे सौदी अरेबियात आपत्कालीन लँडींग करण्यात आले. जखमी मच्छार यांच्यावर सुरुवातीला सौदी अरेबियातील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना आता अबू धाबीमधील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती संयुक्त अरब अमिरातीमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी दिली.
‘मी हनुमान चालिसा बोलत होतो’
आपल्याला चांगल्या पद्धतीचे उपचार मिळाल्याचे कॅप्टन स्मित मच्छार यांनी यावेळी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले, “मी सकारात्मकतेवर विश्वास ठेवतो. मी जेव्हा कठीण प्रसंगात असतो तेव्हा मी हनुमान चालीसा म्हणतो. विमानातील त्या प्रसंगावेळीही मी फक्त हनुमान चालीसा पुटपुटत होतो.”
यावेळी कॅप्टन स्मित मच्छार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पंतप्रधान मोदी यांनी फोन केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच तुमच्याशी कधी असे बोलता येईल, याची कल्पना केली नव्हती, असेही मच्छार म्हणाले.
