Iran Israel Conflict : मध्यपूर्वेत सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. फोनवरून झालेल्या या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी या संघर्षाबाबत भारताची भूमिका स्पष्ट केले, तसेच लवकरात लवकर तणाव कमी करण्यावर भर दिला
एक्सवर जारी केलेल्या निवेदनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “सध्याच्या प्रदेशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी अलिकडच्या घडामोडींबद्दल भारताच्या चिंता व्यक्त केली आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यावर भर दिला. तसेच भारताने संघर्ष लवकर थांबवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली.”
पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी संवाद साधल्यानंतर काही वेळातच ही घडामोड समोर आली. या चर्चेदरम्यान मोदींनी इराणने युएईवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि त्या प्रदेशातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली.
“युएईचे अध्यक्ष, माझे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी संवाद साधला. युएईवरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि या हल्ल्यांमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल संवेदना व्यक्त केल्या. या कठीण काळात भारत हा युएईच्या पाठीशी उभा आहे,” असे पंतप्रधान मोदी एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी इस्रायल आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी तणाव कमी करण्यासाठी चर्चा आणि राजनैतिक मार्गांचा अवलंब करण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.
याबरोबरच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवेत आणि बहरीन येथील प्रमुख समकक्ष नेत्यांशीही चर्चा केली. इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर, इराणने प्रत्युत्तरादाखल या देशांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे या प्रदेशात राहणार्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या मुद्द्यावर जयशंकर यांनी यावेळी जोर दिला.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार
इराण आणि अमेरिका तसेच इस्रायल यांच्यातील तणाव शिगेला पोहचला आहे.अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (वय ८६) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्याबरोबरच इराणच्या संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अब्दुलरहिम मौसावी, संरक्षणमंत्री अझीझ नसीर झादेह, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख आणि सुरक्षा सल्लागार अली शामखानी हेदेखील हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिन्यांनी दिली.
खामेनी यांच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अली रझा अराफी यांची इराणच्या नेतृत्व मंडळात न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खामेनी यांच्यानंतर नवे नेतृत्व नियुक्त होईपर्यंत ते हंगामी कारभार सांभाळतील. ‘आयएसएनए’ या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. इराणच्या नव्या नेतृत्वाने चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ही चर्चा तातडीने व्हायला हवी अशी अपेक्षा ट्रम्प यांनी अटलांटिक नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. मात्र ही चर्चा कुणाशी आणि केव्हा होणार हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही.
