PM Modi Women’s Reservation Bill Speech Highlights: संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण) लागू करण्यासाठी तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात एकूण तीन विधेयके सादर केली जाणार आहेत. महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेमुळे उत्तर आणि दक्षिण भारतात मोठे अंतर निर्माण होईल, असा आरोप विरोधक करत आहेत. लोकसभेत सादर करण्यात आलेली तीन विधेयके आणि महिला आरक्षण विधेयकाद्वारे कोणताही दुजाभाव किंवा अन्याय होणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिले. तसेच या विधेयकामुळे कोणत्याही एका पक्षाचा लाभ होणार नाही, असेही ते म्हणाले. “तुम्ही माझा विरोध करत असाल तर आमचा राजकीय फायदा होईल, पण तुम्ही आम्हाला पाठिंबा दिल्यास कुणाचाही लाभ होणार नाही”, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि द्रमुक पक्षावर उपरोधिक टीका केली. या दोघांनीही या विधेयकाला विरोध केला आहे. द्रमुक पक्षाने काळ्या रंगाचे कपडे परिधान करून विधेयकाचा विरोध केला. यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, यांनी विधेयकाला काळा टिळा लावून विधेयकाला वाईट नजरेपासून वाचवले आहे.
कोणती तीन विधेयके सादर झाली?
केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन मेघवाल यांनी ‘संविधान (१३१ वी सुधारणा) विधेयक’, ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक’ आणि केंद्रशासित प्रदेशात महिला आरक्षण लागू करण्यासाठी ‘केंद्रशासित प्रदेश कायदा (सुधारणा) विधेयक’ हे तीन विधेयक सादर केले. या तीनही विधेयकांवर विरोधकांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे
१) महिला आरक्षण विधेयकाचे समर्थन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, राजकीय पक्षांनी या विधेयकाला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन केले. सभागृहात महिलांना आरक्षण देण्याच्या विधेयकाला राजकीय रंग देण्याची गरज नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
२) पंतप्रधान मोदींनी सर्व सदस्यांना इशारा दिला की, जे लोक आज महिला आरक्षण विधेयकाला विरोध करतील, त्यांना पुढे मोठी किंमत मोजावी लागेल. महिलांना आरक्षण देण्याची ही संधी सर्व खासदारांनी गमावू नये.
३) विरोधकांना संदेश देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जर तुम्ही माझा विरोध केला, तर साहजिकच याचा राजकीय लाभ मला मिळेल. पण जर तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तर कुणालाही याचा लाभ होणार नाही. तसेच या विधेयकाचे श्रेय आम्हाला नको आहे, जर तुम्हाला (विरोधकांना) याचे श्रेय घ्यायचे असेल तर मी यासाठी तयार आहे.
४) समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका करत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, अखिलेशजी माझे मित्र आहेत. त्यामुळे ते अधूनमधून मला पाठिंबा देतात. हे खरे आहे की, मी मागासवर्गीय समाजातून आलो आहे, पण सर्वांना बरोबर घेऊन जाणे, ही माझी जबाबदारी आहे.
५) “आम्हाला विकसित भारत ही संकल्पना सत्यात आणायची आहे. यासाठी धोरणनिर्मितीमध्ये ‘सबका साथ, सबका विकास’ हे सूत्र असायला हवे. त्यामुळेच देशातील ५० टक्के लोकसंख्येचा भाग असलेल्यांना धोरणनिर्मितीमध्ये घेणे काळाची गरज आहे”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
६) महिला आरक्षण विधेयक हे कुणावरही अन्याय किंवा दुजाभाव करणार नाही, ही माझी गॅरंटी आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. याला तुम्ही गॅरंटी म्हणा, आश्वासन म्हणा किंवा कोणत्याही राज्यातील भाषेत असलेला शब्द वापरा. आमची भावना प्रामाणिक असून या विधेयकाचा लाभ कोणत्याही एका पक्षाला होणार नाही.
७) पंतप्रधान मोदी म्हणाले, विरोधकांना मी एक मैत्रीपूर्ण सल्ला देऊ इच्छितो. देशात जेव्हापासून महिला आरक्षणाची चर्चा सुरू झाली, तेव्हापासून महिलांना मिळणाऱ्या या अधिकाराचा ज्यांनी ज्यांनी विरोध केला, त्यांना देशातील महिलांनी निवडणुकांमध्ये माफ केलेले नाही.
८) आपण खासदारांनी ही महत्त्वाची संधी हातातून जाऊ देऊ नये. आपण भारतीय एकत्र येऊन देशाला नवी दिशा देणार आहोत. शासनप्रणालीत संवेदनशीलता रुजविण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे देशाच्या राजकारणाला एक नवा आकार मिळणार आहेच, त्याशिवाय देशाची दिशा आणि स्थितीही निश्चित होईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
९) केवळ चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले, याचा अर्थ विकसित भारत होईल, असे नाही. तर महिलांचाही धोरण निर्मितीत सहभाग वाढवले पाहिजे. त्यामुळे महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी या विधेयकाला पाठिंबा द्यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.
१०) आज देशभरात तळागाळापासून महिला नेतृत्वात वाढ झाली आहे. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाद्वारे प्रत्येक पक्षातील महिलांना याचा लाभ होईल. तसेच भविष्यात त्यांना पुढे जाता येईल, असेही ते म्हणाले.
