PM Modi SRCC Speech on India Economic Growth : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) च्या शताब्दी सोहळ्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत २०१३ मधील देशाची परिस्थिती व सद्यस्थिती यांची तुलना केली. २०१३ मध्ये मोदींनी याच संस्थेत भाषण केलं होतं, जे गुजरातबाहेर तरुणांना संबोधित केलेलं त्यांचं पहिलं मोठं भाषण होतं. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि भाजपाचे भावी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते.

भारताची ‘फ्रॅजाइल फाईव्ह’ मध्ये गणना केली होती

मोदींनी तरुणांना २०१३ मधील देशाची काय स्थिती होती, हे इंटरनेटवर जाऊन पाहण्याचं आवाहन केलं. “आजकालची एक टोळी या भाषणाचे छोटे तुकडे (क्लिपिंग्ज) करेल”, असं सांगत त्यांनी त्या काळात प्रसारमाध्यमांमध्ये काय बातम्या होत्या यावर लक्ष केंद्रित केलं. त्यावेळी नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय जवानांची झालेली हत्या, जागतिक बँकेने भारताच्या जीडीपी (GDP) दरात केलेली कपात आणि हेलिकॉप्टर घोटाळा या बातम्या चर्चेत होत्या. “या गोष्टी आपल्याला त्या काळातील देशाच्या परिस्थितीची जाणीव करून देतात. विकासदर खाली घसरला होता आणि महागाई गगनाला भिडली होती. जग भारताला ‘पॉलिसी पॅरालिसिस’ (धोरणात्मक अर्धांगवायू) असलेला देश म्हणत होते आणि ‘फ्रॅजाइल फाईव्ह’ (पाच कमकुवत) अर्थव्यवस्थांमध्ये त्याची गणना केली जात होती. मात्र, आज जग भारताकडे सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पाहत आहे”, असं पंतप्रधान म्हणाले.

“७.८% विकासदराने देशाला नवा उत्साह दिला आहे. ही वाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू आहे. यातून भारताची क्षमता दिसून येते. पण भारताला ‘फ्रॅजाइल फाईव्ह’मध्ये ढकलणाऱ्यांना ही आकडेवारी पचनी पडत नाहीये”, असं मोदी नुकत्याच सरकारी जीडीपी आकडेवारीवरून झालेल्या वादाचा संदर्भ देत म्हणाले. मोदींनी आठवण करून दिली की, २०१३ मधील त्यांच्या भाषणावेळी लोकांनी अशी अपेक्षा केली होती की ते तत्कालीन काँग्रेस प्रणित केंद्र सरकारवर हल्लाबोल करतील. परंतु, विरोधात असूनही आणि सरकारचे टीकाकार असूनही, त्यांनी या मंचाचा वापर राजकीय हल्ल्यासाठी केला नाही. मोदी म्हणाले की, त्यांनी तेव्हा एक दृष्टीकोन (व्हिजन) मांडला होता आणि आत्मविश्वासाने संवाद साधला होता.

काँग्रेसला नेहमी ग्लास अर्धा रिकामा दिसला

“पाण्याचा अर्धा भरलेला ग्लास तीन प्रकारे पाहिला जाऊ शकतो: काही जण तो अर्धा भरलेला पाहतात, काही जण तो अर्धा रिकामा पाहतात, तर काही जण तो पाणी आणि हवेने पूर्ण भरलेला पाहता. भारत प्रगती करत आहे आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देत आहे”, असं सांगत मोदी पुढे म्हणाले, “नकारात्मक विचार करणाऱ्यांसाठी २०१३ पासून हा ग्लास अर्धा रिकामाच आहे आणि पुढेही तसाच राहील. मी २०१३ मध्ये येथे लोकाभिमुख सुशासनाचा (गुड गव्हर्नन्स) विचार मांडला होता. पूर्वी सत्तेत असलेले लोक केवळ संकट आल्यावरच जागे व्हायचे. मी हा दृष्टीकोन बदलला आहे आणि २०१४ पासून ते सिद्ध करून दाखवले आहे”, असंही मोदी म्हणाले.

सुरुवातीला पंतप्रधानांनी आठवण करून दिली की, SRCC चा प्रवास दिल्लीच्या दर्यागंज भागातून सुरू झाला होता आणि त्या छोट्या जागेचे आता एका मोठ्या संस्थेत रूपांतर झालं आहे. “१०० हून अधिक वर्षांपासून, श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सने विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांना शिकण्याची, प्रगती करण्याची आणि समाजात बदल घडवून आणण्याची संधी दिली आहे”, असं मोदी म्हणाले. “तुमच्या भाषेत सांगायचं तर, येथील माजी विद्यार्थी ‘ओजी’ (OG) आहेत. त्यांनी जगभरात SRCC चं नाव उज्ज्वल केलं आहे”, असा कॉर्पोरेट आणि जेन झी मधील लोकप्रिय शब्द वापरत त्यांनी कौतुक केलं.

पंतप्रधान मोदी SRCC मधील भाषणात ‘दिमागी नक्षल’ बद्दल काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींनी ‘दिमागी नक्षल’चं वर्णन करण्यासाठी होमिओपॅथीचे उदाहरण दिले होते. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे होमिओपॅथी औषध आजार बरे करण्यापूर्वी सुरुवातीला तो वाढवते, तसेच काहीसे ‘दिमागी नक्षल’च्या बाबतीत घडत आहे. पंतप्रधान म्हणाले, “तुम्ही माझे लाल किल्ल्यावरील भाषण ऐकले असेल. मी लाल किल्ल्यावरून “दिमागी नक्षल” नावाची होमिओपॅथीची गोळी दिली होती. होमिओपॅथीच्या सिद्धांतानुसार, जेव्हा तुम्ही होमिओपॅथी उपचार सुरू करता, तेव्हा आजार सुरुवातीला अधिक वाढतो. हा होमिओपॅथीचा स्वभाव आहे. त्याचप्रमाणे, मी दिमागी नक्षल ही होमिओपॅथीची गोळी देताच, सर्व दिमागी नक्षल एकामागून एक समोर येऊ लागले आहेत. आणि आता जनताही या आजाराचा प्रसार करणाऱ्यांचे खरे रंग पाहत आहे.”