नवी दिल्ली : पेपरफुटी हे घोर पाप आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘एनडीए’ संसदीय पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले.

‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) मोर्चानंतर भाजप व केंद्र सरकारवर दबाव वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणावर केलेली टिप्पणी महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आंदोलकांच्या मागणीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नड्डा यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले असले तरी त्यावरही केंद्र सरकारने मंगळवारी मौन बाळगले.

पेपरफुटी प्रकरणातील दोषींना देशातील सर्वोत्तम कायदेतज्ज्ञांच्या (धुरंधर) मदतीने कठोर शिक्षा केली जाईल. कोणीही भविष्यात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचे धाडस करणार नाही असे निर्देश मोदींनी दिल्याचे  ‘एनडीए’ खासदारांच्या या ‘मंगल मिलन’ बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकारांना सांगितले. पेपरफुटीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. हा पक्षीय राजकारणाचा विषय नाही; हा राष्ट्रीय हिताचा विषय आहे, असेही मोदींनी बैठकीत नमूद केल्याची माहिती रिजिजू यांनी दिली.