शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी शुक्रवारी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चांना जोर आला आहे. दोन्ही पक्षांकडून युतीबाबत कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली, तरी या भेटीमुळे पंजाबच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
अनेक वर्षांनंतर वाढल्या युतीच्या शक्यता
भाजपा आणि शिरोमणी अकाली दल हे दोन दशकांहून अधिक काळ पंजाबमधील प्रमुख राजकीय मित्रपक्ष होते. मात्र सप्टेंबर २०२० मध्ये केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही पक्षांची युती तुटली. त्यानंतर २०२१ मध्ये केंद्राने कृषी कायदे मागे घेतले, तरी दोन्ही पक्षांतील दुरावा कायम राहिला.
२०२२ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा फटका
२०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील सत्तासंघर्षाने कमजोर झालेल्या काँग्रेसला मतदारांनी नाकारले. भाजपा आणि अकाली दल यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्याचा दोन्ही पक्षांना मोठा फटका बसला. ११७ सदस्यीय विधानसभेत भाजपाला केवळ दोन जागा, तर अकाली दलाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत प्रथमच पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आणि भगवंत मान मुख्यमंत्री झाले. यातून शीख-बहुल असलेल्या या राज्यात परिवर्तन दिसले. एकेकाळी पंजाबच्या राजकारणावर वर्चस्व असलेले भाजपा-अकाली दल गेल्या काही वर्षांत राजकीयदृष्ट्या कमकुवत झाले आहेत. त्यांच्या पारंपरिक मतदारांमध्ये घट झाली असून, आम आदमी पक्षाने राज्यातील प्रमुख राजकीय शक्ती म्हणून स्वतःचे स्थान मजबूत केले आहे.
युतीची अधिकृत घोषणा नाही
सुखबीर सिंह बादल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या असल्या, तरी अजून कोणत्याही बाजूने अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, या भेटीमुळे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकांपूर्वी हे भागीदार आपले संबंध पुन्हा सुधारू शकतील का, याविषयीच्या चर्चेला अधिक जोर येण्याची शक्यता आहे.
