पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर भारत आणि स्वीडनदरम्यान सामरिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित संबंध दृढ झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, दुर्मीळ खनिजे, नवनिर्मिती, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांमध्ये संबंध बळकट करण्यावर चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रीस्टरसन यांच्यामध्ये द्विस्तरावरील संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. स्वीडनच्या युवराज्ञी व्हिक्टोरिया यादेखील बैठकीत सहभागी झाल्या होत्या. पुढील पाच वर्षांत दोन्ही देशांतील व्यापार आणि गुंतवणूक दुप्पट करण्यावर उभय नेत्यांत एकमत झाले.

पंतप्रधान मोदी यांना ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलार स्टार, डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस’ हा स्वीडनमधील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. भारत-स्वीडनमधील संबंध अधिक मजबूत करण्यामध्ये त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांचे नेतृत्व यांची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. मोदी यांनी उद्योगांसाठीच्या ‘युरोपियन राउंड टेबल’मध्ये सहभाग घेतला. भारतामध्ये गुंतवणूक करण्याचे त्यांनी युरोपीय कंपन्यांना आवाहन केले.

दोन्ही देशांतील संबंधांना सामरिक भागीदारीचा दर्जा देण्यात आला. संयुक्तपणे नवनिर्मिती क्षेत्रातील भागीदारीचे आणि भारत-स्वीडन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले आणि पुढील पाच वर्षांत भारत-स्वीडनमधील व्यापार व गुंतवणूक दुप्पट करण्यावर एकमत झाले. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

द्विपक्षीय सहकार्य

– भारत-स्वीडन संयुक्त नवनिर्मिती भागीदारी २.० चे अनावरण – विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ६-जी, क्वांटम कम्प्युटिंग, दुर्मीळ खनिजे, अपारंपरिक ऊर्जा, स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान यांमध्ये सहकार्य

– भारत-स्वीडन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कॉरिडॉर – कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, उद्योग-स्टार्टअप, संशोधनामध्ये तंत्रज्ञान भागीदारीचा समावेश

– ‘विकास भी विरासत भी’ अंतर्गत टागोर-स्वीडन व्याख्यानमालेची घोषणा.

नॉर्वेच्या पंतप्रधानांबरोबर चर्चा

ओस्लो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन दिवसांच्या स्वीडन दौऱ्यावरून नॉर्वे येथे सोमवारी आगमन झाले. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, हरित तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांचे पंतप्रधान स्टोअर यांनी विमानतळावर स्वागत केले. मोदी यांचा हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे.

गेल्या ४३ वर्षांतील भारतातील पंतप्रधानांनी केलेलाही हा पहिलाच दौरा आहे. ओस्लो येथे १९ मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या ‘नॉर्डिक-इंडियन’ शिखर परिषदेत ते सहभागी होतील. यामध्ये डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड, स्वीडन यांचाही समावेश असेल. यापूर्वी २०१८मध्ये स्टॉकहोम आणि मे २०२२ मध्ये कोपनहेगन येथे ही परिषद झाली होती. राजा हेराल्ड पाचवे आणि राणी सोन्जा यांचीही मोदी भेट घेतील.