PM Modi telephonic talk Iranian President: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. पश्चिम आशियातील वाढता तणाव कमी करण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच झालेल्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारानंतर, पेझेश्कियान यांनी मोदींना तिथल्या घडामोडींची माहिती दिली.

मोदी आणि पेझेश्कियान यांच्यात काय चर्चा झाली?

पंतप्रधान मोदी आणि पेझेश्कियान यांच्यात झालेल्या या संभाषणादरम्यान, पेझेश्कियान यांनी पश्चिम आशियातील बदलती परिस्थिती आणि पुढील वाटचाल कशी असेल? याबाबत मोदींना माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी या दोन्ही देशांमधील सामंजस्य कराराचे स्वागत केले, तसेच सर्व वाद आणि मतभेद हे केवळ परस्पर संवाद आणि राजनैतिक चर्चेच्या माध्यमातूनच सुटले पाहिजेत, या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पश्चिम आशिया क्षेत्रात दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी नमूद केले. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील दळणवळणाचे स्वातंत्र्य आणि जागतिक व्यापार सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावरही मोदींनी भर दिला. पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

अयातुल्ला अली खामेनी यांचा अंत्यसंस्कार विधी

इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली होती. यावरुन देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. खामेनी यांचा अंत्यसंस्कार विधी ४ जुलैपासून सुरू होणार आहे.