भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आता गुजरातच्या गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे. पंतप्रधान मोदी आज(शुक्रवार) या नवीन सुधारित ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या मार्गावर या ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. यामुळे आता देशाला तिसरी वंदे भारत ट्रेन आज प्राप्त होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश उपस्थित राहणार आहेत.
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एकूण १ हजार १२८ प्रवासी बसण्याची क्षमता आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली. त्याचवेळी दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा मार्गावर चालवण्यात आली. आज तिसरी वंदे भारत ट्रेन गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.

तिसरी वंदे भारत ट्रेन आधीच्या वंदे भारत ट्रेनपेक्षा वेगळी असणार आहे. या नव्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधा पाहता अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन ट्रेनमध्ये कोविडबाबत विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे.

काय असणार सुविधा? –

ही ट्रेन पूर्णपणे वातानुकुलीत(एसी) असणार आहे. याशिवाय ट्रेनमध्ये जागोजागी चार्जिंग पॉईंट, स्लाईडिंग विंडो, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, अटेंडेंट कॉल बटन, स्वयंचलित दरवाजे, बायो-टॉयलेट, सीसीटीव्ही, आरामदायी आसन व्यवस्था, रिक्लाइनिंग सुविधा इत्यादी बाबींचा ट्रेनमध्ये समावेश असणार आहे.

स्वदेशी सेमी-हायस्पीड म्हणून ओळखली जाणारी ही ट्रेन अवघ्या ५२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठते. प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेनमध्ये स्लाइडिंग फूटस्टेप्ससह स्वयंचलित प्लग दरवाजे तसेच टच फ्री स्लाइडिंग दरवाजे बसवले आहेत. एसी मॉनिटरिंगसाठी कोच कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टम, कंट्रोल सेंटर आणि मेंटेनन्स कर्मचार्‍यांशी संवाद आणि प्रतिक्रियेसाठी GSM/GPRS सारखे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi to flag off new vande bharat express from gandhinagar today msr
First published on: 30-09-2022 at 07:38 IST