US Ambassador Sergio Gor: “येत्या जी२० परिषदेत डोनाल्ड ट्रम्प ज्या नेत्यांना भेटू इच्छितात, त्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात वरच्या स्थानी असतील. दोन्ही नेत्यांमधील मैत्री आणि दोन देशांमधील वाढते संबंध यामुळे हे शक्य होत आहे”, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर म्हणाले. डिसेंबरमध्ये होणारी जी२० परिषद खास असेल, असेही गोर म्हणाले.

ट्रम्प यांच्या भेटीच्या यादीत मोदी अव्वल

सर्जिओ गोर यांनी ‘इंडिया टुडे टीव्ही’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत डिसेंबरमध्ये होणाऱ्या जी२० परिषदेसाठी पंतप्रधान मोदी फ्लोरिडाला भेट देतील. यावेळी ट्रम्प आणि मोदी यांची होणारी भेट केवळ परिषदेपुरती मर्यादित न राहता अधिक खास असेल, असे गोर म्हणाले. “जर तुम्ही ट्रम्प यांना विचारले की, परिषदेला आलेल्या ३५ नेत्यांपैकी तुम्हाला कोणाला भेटायला आवडेल? तर पंतप्रधान मोदी त्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असतील. ट्रम्प मोदींना चांगले मित्र मानतात. त्यामुळे या भेटीत केवळ बैठकीपेक्षा अधिक काहीतरी घडेल, अशी मला अपेक्षा आहे”, असे गोर पुढे म्हणाले.

व्यापार करार लवकरच होण्याची शक्यता

ट्रम्प पुढील वर्षी भारताला भेट देण्याची शक्यता गोर यांनी व्यक्त केली. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत बोलताना गोर यांनी दोन्ही देश कराराच्या खूप जवळ पोहोचले आहेत, असेही सांगितले. येत्या काही महिन्यांत हा करार अंतिम होईल अशी आशा देखील गोर यांनी व्यक्त केली. भारतातील राजकीय आणि आर्थिक स्थिरता अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत देखील गोर यांनी या मुलाखतील बोलताना मांडले. “भारताची प्रगती आमच्यासाठी चांगली बाब आहे. आम्हाला स्थिर भारताशी काम करायचंय,” असे त्यांनी नमूद केले.

भारत – अमेरिका संरक्षण भागीदारीवर भाष्य

भारत अमेरिकेचा विश्वासू संरक्षण भागीदार असल्याचे गोर म्हणाले. “हे नातं केवळ लष्करी उपकरणांच्या विक्रीपुरते मर्यादित नाही, तर ते विश्वासावर आधारित आहे. अमेरिका जगातील प्रत्येक देशाला आपली लष्करी उपकरणे विकत नाही. भारत जेवढे लष्करी सराव अमेरिकेसोबत करतो, तेवढे इतर कोणत्याही देशासोबत करत नाही”, असे गोर म्हणाले. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘क्वाड’ हे संघटन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे गोर म्हणाले.