India Uzbekistan Uranium Deal and Trade Agreement: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांच्यात ताश्कंद येथे रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत नागरी अणुऊर्जेसाठी दीर्घकालीन युरेनियम पुरवठा, डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण आणि खाणकाम यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमधील सहकार्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच २०३० पर्यंत परस्पर व्यापार ५ अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्टही दोन्ही देशांनी निश्चित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय उझबेकिस्तान दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापार, पायाभूत सुविधा, दुर्मिळ खनिजे, संरक्षण आणि सुरक्षा, इनोव्हेशन, कृषी, औषधनिर्माण, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान आणि ‘यूपीआय’सह डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील सहकार्याचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला.
या बैठकीनंतर खाणकाम, संस्कृती, शिक्षण, पर्यटन आणि आयुर्वेद यांसह विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. उझबेकिस्तानमधील ‘फयाज तेपा’ आणि ‘कारा तेपा’ या बौद्ध वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करण्याबाबतच्या सहकार्य कराराचाही यात समावेश आहे.
दीर्घकालीन युरेनियम पुरवठ्यावर भर
भारतातील नागरी अणुऊर्जा प्रकल्पांची गरज भागवण्यासाठी उझबेकिस्तानकडून दीर्घकालीन युरेनियम खरेदीचा मार्ग सुकर करण्यावर या बैठकीत एकमत झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला १५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर उभय देशांचे संबंध अधिक भक्कम टप्प्यावर नेले जात आहेत. सहकार्याला योग्य दिशा देण्यासाठी परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावर ‘समन्वय परिषद’ स्थापन केली जाईल. तसेच दोन्ही देशांमधील संयुक्त आयोगाचा दर्जा सचिव स्तरावरून थेट मंत्री स्तरावर वाढवला जाईल.”
पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान
दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑलीय दरजाली दोस्तलिक’ प्रदान करून गौरविण्यात आले. मोदी यांना मिळालेला हा ३६ वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “‘दोस्तलिक’ या शब्दाचा अर्थ मैत्री असा होतो. हा सन्मान म्हणजे भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक आणि दृढ मैत्रीचे प्रतीक आहे. हा माझा वैयक्तिक नसून १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे.”
पंतप्रधान मोदी यांनी ताश्कंदमधील ‘यांगी उझबेकिस्तान’ स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले. तसेच तेथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष योग प्रात्यक्षिक कार्यक्रमालाही त्यांनी उपस्थिती लावली. ताश्कंदमधील द्विपक्षीय चर्चा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान बिश्केक येथे होणाऱ्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या शिखर परिषदेसाठी रवाना होणार आहेत.
