पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (८ सप्टेंबर) गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान वडोदऱ्यामध्ये ‘नमो फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित तरुणांनी मोदींचं जंगी स्वागत केलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी तब्बल ३५,२०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे.

‘नमो फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी देशातील विविध विकासकामांसह देशभरातील आदी महत्वाच्या विषयांवर महत्वाचं भाष्य करत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ‘आम्ही १० वर्षांत ५० हजार रेल्वेच्या डब्यांची निर्मिती केली, पण काँग्रेसला १० वर्षांत ५० हजार शौचालयेही बांधता आली नव्हती’, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

वडोदरामध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर झालेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी नागरिकांचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले की, “वडोदरा येथील प्रकल्पांमुळे भारताच्या विकासयात्रेला नवी गती मिळेल. भारताच्या विकासयात्रेला गती देण्यासाठी आज कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं आहे. मात्र, भाजपा केंद्रात सत्तेत येण्याच्याआधी ‘फ्रेट कॉरिडॉर’ची संकल्पना फक्त कागदावरच अडकून पडली होती. आधीच्या सरकारमध्ये फाईली फक्त टेबलांवर पडून राहायच्या”, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’च्या (मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका) अंमलबजावणीमध्ये झालेल्या विलंबावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “२००४ मध्ये ही संकल्पना मांडल्यानंतर हा प्रकल्प अनेक वर्षे केवळ कागदपत्रांमध्ये अडकून पडला होता. २००४ मध्ये ही संकल्पना मांडण्यात आली होती. या कामासाठी २००६ मध्ये एका कंपनीची स्थापना करण्यात आली. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांपैकी अनेकांचा, जेव्हा ही संकल्पना पहिल्यांदा मांडली गेली, तेव्हा कदाचित जन्मही झाला नसेल. २०१४ पर्यंत या प्रकल्पांची फाईल तशीच पडून होती, ती फाईल इकडून तिकडे फिरत होती. आधी प्रकल्पांच्या फाईली टेबलांवरच पडून राहायच्या. मात्र, आता ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ हे गेल्या १२ वर्षांत देशाच्या कार्यसंस्कृतीत झालेल्या बदलाचं एक उदाहरण आहे”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

“विकसित भारतासाठी आपल्याला अशा कनेक्टिव्हिटीची गरज आहे. जी केवळ सोयीस्कर नाही तर सुसंगत आणि वेगवानही असेल. वडोदरा हे ‘गती शक्ती विद्यापीठा’चं केंद्र आहे. आज येथून ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’चे अंतिम दुवे जोडले गेले आहेत. २ हजार ८०० किलोमीटरहून अधिक लांबीचा ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ प्रकल्प पूर्ण होत आहे. २१ व्या शतकातील भारतासाठी हा खरोखरच एक ऐतिहासिक टप्पा आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

“संपूर्ण शहरात ज्या सेवाभावाने तुम्ही ‘स्वच्छता से स्वागत’ ही मोहीम राबवली, त्याबद्दल मी वडोदऱ्याच्या प्रत्येक नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो. काल मी एक व्हिडीओ पाहिला आणि तो पाहून मला खूप अभिमान वाटला. यावर्षी लाल किल्ल्यावरून मी ‘विकसित भारता’साठी सात-सूत्री संकल्पाची हाक दिली होती. या सात-सूत्री संकल्पापैकी एक म्हणजे ‘गती शक्ती’ आहे”, असंही मोदी म्हणाले आहेत.

‘काँग्रेसला ५० हजार शौचालयेही बांधता आले नाही’ : मोदी

“२०१४ पासून भारताने सुमारे ५० हजार आधुनिक रेल्वे डब्यांची निर्मिती केली आहे. पण याउलट मागील सरकारला १० वर्षांत ५० हजार शौचालये देखील बांधता आलेली नव्हती”, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.