पीटीआय, पॅरिस : “तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध झाले तरच प्रगती करणे शक्य होईल,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पॅरिस येथे आयोजित ‘व्हिवाटेक २०२६’ या जागतिक तंत्रज्ञान परिषदेत बोलताना केले. अमेरिकेने अँथ्रोपिकच्या अगदी अलीकडील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रारुपांचा वापर परदेशी नागरिकांनी करण्यावर निर्बंध आणले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा उपस्थित केला.
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारत प्रगती करत असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. तसेच देशामध्ये या क्षेत्रातील घडामोडींवर भाष्य केले. गेल्या दशकभरात भारतात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगाने परिवर्तन होत असल्याचे ते म्हणाले. ‘व्हिवाटेक २०२६’ हा युरोपमधील तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा आघाडीचा मेळावा आहे.
जगातील सर्वात मोठी डिजिटल परिचय यंत्रणा निर्माण करण्यापासून जगातील सर्वात मोठी डिजिटल देयक प्लॅटफॉर्म विकसित करण्यापर्यंत आम्ही वित्तीय समावेश, शिक्षण, टेलिमेडिसीन यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
व्यापार कराराला गती देण्याचे निर्देश
एव्हियां ले बँ (फ्रान्स) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी व्यापार कराराला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी त्यासंबंधी माहिती देताना सांगितले की, व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे ट्रेड रिप्रेझेन्टेटिव्ह जेमिसन ग्रीर पुढील आठवड्यात भारतात येत आहेत.
