PM Narendra Modi Speech in Loksabha: आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे सध्या देशात त्याचीच चर्चा चालू असली, तरी या चर्चेत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर संसदेचं विशेष अधिवेशन पाचारण करण्यात आलं आहे. महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देण्यासंदर्भातल्या विधेयकावर या अधिवेशनाच चर्चा होऊन ते संमत करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तीन दिवसांच्या अधिवेशनात या विधेयकावरील चर्चेसाठी १८ तासांचा अवधी देण्यात आला आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील तरतुदीचा जोरकसपणे पुरस्कार करतानाच विरोधकांवर खोचक शब्दांत टीका केली.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
महिलांसाठी आरक्षणाबाबत आधी जनगणना, त्यानुसार २०२७ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना व त्यानंतर महिलांसाठी आरक्षण लागू करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल, असं मानलं जात होतं. मात्र, त्याआधीच महिला आरक्षणाबाबतचा मुद्दा मान्य करून ते २०२९ च्या निवडणुकीपासूनच लागू करण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारकडून केला जात आहे. या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांवर नरेंद्र मोदींनी यावेळी टीका केली.
“जेव्हा ३०-३५ वर्षांपूर्वी महिला आरक्षणाची गरज निर्माण झाली, तेव्हाच ते लागू केलं गेलं असतं आणि वेळेनुसार त्यात सुधारणा झाल्या असत्या तर ते योग्य ठरलं असतं. पण आता आपण सर्व खासदारांनी या महत्त्वपूर्ण संधीला दवडता कामा नये. आपण देशाला नवी दिशा देत आहोत. या विचारमंथनातून जे अमृत निघेल, ते देशाच्या राजकारणाचं स्वरूप ठरवणार आहेच, पण ते देशाची पुढची दिशा ठरवणार आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
“आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना महिलांनी माफ केलेलं नाही”
याआधी जेव्हा जेव्हा महिला आरक्षणाची चर्चा झाली, तेव्हा त्याला विरोध करणाऱ्यांना त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये महिला मतदारांनी धडा शिकवल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. “महिला आरक्षणाला आपण आधीच खूप उशीर केला आहे. जे आज राजकारण करतायत, त्यांना मी एक मित्र म्हणून सल्ला देऊ इच्छितो. आपल्या देशात जेव्हा जेव्हा महिला आरक्षणाची चर्चा झाली आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या, त्यात आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना देशातल्या महिलांनी माफ केलेलं नाही. त्यांची अवस्था वाईट केली आहे”, असं मोदी म्हणाले.
“आजही मी म्हणतो आपण सगळे सोबत आलो, तर त्याचं श्रेय कुणाही एकाला मिळणार नाही. हा निर्णय देशाच्या लोकशाहीच्या बाजूने होईल. त्याचं श्रेय आपल्या सगळ्यांना मिळू शकतं. फक्त मी किंवा सरकारला नाही. ज्यांना यात राजकारण दिसतंय, त्यांनी गेल्या ३० वर्षांत आपण काय केलं, ते पाहून घ्यावं. आज सोबत येण्यात त्यांचा फायदाच आहे. या प्रकाराला राजकीय रंग देण्याची गरज नाही”, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांना खोचक सल्ला दिला. “जे आज या विधेयकाला विरोध करतील, त्यांना दीर्घकाळ त्याची किंमत चुकवावी लागेल”, असा इशारादेखील पंतप्रधानांनी दिला.
“मला याचं श्रेय नको, तुम्हीच घ्या श्रेय”
दरम्यान, सरकारला या विधेयकाचं श्रेय मिळेल म्हणून विरोधक याला विरोध करत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केला. “जर विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला तर याचा लाभ मला होणार हे खरं आहे. पण विरोधक सोबत आले तर सगळ्यांचा फायदा होईल. आम्हाला याचं श्रेय नकोय. हे विधेयक पारित झाल्यावर उद्या मी सगळ्यांचे धन्यवाद करेन. सरकारी खर्चातून मी सगळ्यांचे फोटोही छापून देईन. तुम्ही घ्या श्रेय”, असं मोदी यावेळी विरोधकांना उद्देशून म्हणाले.
