PM Modi Welcomes US Iran Peace Deal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचे स्वागत केले आहे. करारामुळे शांतता निर्माण होण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत (होर्मुझ सामुद्रधुनीतून) होण्याबाबतही पंतप्रधानांनी आशावाद व्यक्त केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शांतता करारावर वाटाघाटी करण्यात आली. या वाटाघाटींना अखेर यश आले असून, उभय देशात युद्ध समाप्त करण्याबाबत आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरु करण्यासाठीचा करार अंतिम झाला असून, स्वित्झर्लंडमध्ये येत्या १९ जून रोजी करारावर स्वाक्षरी होणार आहे.
शांतता कराराच्या चर्चेवर अखेर निघाला तोडगा
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर संयुक्त हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि अनेक बडे अधिकारी ठार झाले. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी झाली, याला इस्रायलने देखील पाठिंबा दिला. यानंतर अमेरिका आणि इराणमधील शांतता कराराचे यजमानपद पाकिस्तानने भूषविले. पण, पहिल्या बैठकीत शांतता करारावर ठोस तोडगा न निघाला नाही. दरम्यान, आता दोन्ही देशांमध्ये शांतता करार झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींनी केले कराराचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराचे स्वागत केले. “पश्चिम आशियातील युद्ध समाप्तीबाबत अमेरिका आणि इराण यांच्यातील करारावर एकमत झाल्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. या युद्धामुळे जगाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि विविध देशांमध्ये अनेकांनी जीव देखील गमावला. शांतता करारा लागू झाल्यानंतर या भागात पुन्हा शांतता आणि स्थैर्य निर्माण होण्यासाठी मदत होईल, तसेच, व्यापार आणि वाहतूक देखील सुरळीत होईल”, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. “अंतिम करार पूर्ण होण्यासाठी उरलेल्या मुद्यांवर देखील एकमत होईल”, असेही मोदींनी म्हटले आहे.
अंतिम करार मंजुरीच्या दिशेने महत्वाचे पाऊल
या कराराचा मसुदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. करारावर स्वाक्षरी अद्याप झाली नसली तरी गेल्या साडेतीन महिन्यापासून सुरु असलेला संघर्ष समाप्त करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने जगावर इंधन आमि नैसर्गिक वायूचे संकट निर्माण झाले होते. ही सामुद्रधुनी पुन्हा सुरु झाल्यास जगाला मोठा दिलासा मिळणार आहे. करारात होर्मुझ पुन्हा खुली करण्यासह युद्धविरामाचा कालावधी वाढविण्याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
