पीटीआय, बोनगाव
सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष महिलांचा छळ करणाऱ्या गुंडांना आश्रय देत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालच्या बोगाव येथे प्रचारात केली. भाजप महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे असे ते यावेळी म्हणाले. तसेच संदेशखलीच्या रेखा पात्रा आणि कोलकात्याच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मृत डॉक्टर विद्यार्थिनीच्या आईला भाजपकडून उमेदवारी दिली जात असल्याचा उल्लेखही मोदींनी यावेळी केला.
उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बोनगावच्या ठाकूरनगर या मतुआ समुदायाचे बाहुल्य असलेल्या ठिकाणी मोदी यांनी प्रचारसभा घेतली. शेजारील देशांमध्ये धार्मिक छळ झालेल्या सर्व निर्वासितांना नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत भारताचे नागरिकत्व दिले जाईल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात गाजलेल्या संदेशखली प्रकरणातील रेखा पात्रा यांना हिंगलगंजमधून आणि आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालियातील बलात्कार व हत्या प्रकरणातील मृत विद्यार्थिीची आई रत्ना देबनाथ यांना पानीहाटी येथून भाजपने उमेदवारी दिली आहे. संदेशखली येथे तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला होता.
तृणमूल काँग्रेसचे क्रूर सरकार राज्यातील महिलांना छळणाऱ्या गुंडांबरोबर आहे. आता हे सहन केले जाणार नाही, हे त्यांना सांगण्याची वेळ आली आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बुधवारी मतदान होत असून सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची योजना जाहीर केली. मतदानात अडथळे आणण्याच्या किंवा मतदारांना अडवण्याच्या घटना कठोरपणे हाताळल्या जातील, असे आयोगाने सांगितले.
