नवी दिल्ली : लडाखमधील गलवान संघर्षानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी द्विपक्षीय चर्चा झाली. ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान झालेल्या या बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांनी परस्परांचा आदर, एकमेकांचे हित आणि एकमेकांबद्दल संवेदनशीलता बाळगण्याचे आवाहन केले. दोन्ही देशांतील मतभेदांचे रूपांतर संघर्षात होऊ नये, अशी भूमिका घेतानाच व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. सुमारे ५० मिनिटे झालेल्या या भेटीत सीमावादाशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा झाली.
भारत-चीन संबंधांमध्ये आलेला तणाव कमी करण्याच्या दिशेने वर्षभरात झालेल्या चर्चांचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. सीमाभागातील शांतता आणि स्थैर्य हे द्विपक्षीय संबंधांच्या पुढील विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. शी जिनपिंग सात वर्षांनंतर भारतदौर्यावर आले आहेत. मोदी यांची गेल्या काही वर्षांत २१ वेळा भेट झाल्याचा उल्लेख जिनपिंग यांनी केला. भारत-चीन संबंधांकडे दीर्घकालीन, धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे नेत्यांनी मान्य केले.
सीमाभागांत शांतता ही पूर्वअट
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता निर्माण करणे हे दोन्ही देशांच्या संबंधांच्या विकासाचा मूलभूत आधार असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. भारताने सातत्याने सीमाभागातील शांतता ही व्यापक द्विपक्षीय संबंधांसाठी पूर्वअट असल्याचे स्पष्ट केले आहे. ही भूमिका यावेळीही मोदी यांनी जिनपिंग यांच्या भेटीत मांडली.
व्यापारातील असमतोलाचा मुद्दा
मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये व्यापार आणि आर्थिक संबंधांवरही बैठकीत चर्चा झाली. व्यापारातील असमतोल आणि पुरवठा साखळीतील अडचणी या मुद्द्यांवर भर देण्यात आला. सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यावसायिक संबंध आणि दोन्ही देशांतील नागरिकांची ये-जा वाढवण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
शिकू आणि सहकार्य करू : जिनपिंग
भारत आणि चीनने एकमेकांच्या सामथ्र्यातून शिकले पाहिजे आणि परस्परांना सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन शी जिनपिंग यांनी केले. भारत आणि चीन हे जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत, तसेच ‘ग्लोबल साऊथ’चे महत्त्वाचे घटक आहेत. दोन्ही देशांवर जागतिक शांतता, स्थैर्य आणि विकासाची मोठी जबाबदारी असल्याचेही जिनपिंग यांनी नमूद केले. सुव्यवस्थित बहुध्रुवीय जग निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांनी सकारात्मक भूमिका बजावावी, असेही जिनपिंग यांनी सांगितले.
