BRICS Summit 2026 : दिल्लीत १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ पार पडली आहे. या ‘ब्रिक्स’ परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांच्यासह आणखी काही राष्ट्रांचे प्रमुख सहभागी झाले होते. या ब्रिक्स परिषदेच्या बैठकीत विविध जागतिक विषयांवर चर्चा झाली आहे. या परिषदेदरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी द्विपक्षीय बैठक पार पडली आहे.
पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीतील चर्चेत भारत आणि चीनमधील मतभेदांचं रूपांतर वादात होऊ न देण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. जवळपास सात वर्षांनंतर शी जिनपिंग हे भारतात दाखल झालेले आहेत. त्यामुळे सात वर्षांनंतर या दोन नेत्यांची ही पहिलीच द्विपक्षीय बैठक होती.
दरम्यान, ऑगस्ट २०२५ मध्ये तियानजिन येथे झालेल्या मागील बैठकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध स्थिर करण्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेच्या प्रगतीचा आढावा यावेळी दोन्ही नेत्यांनी घेतला. सीमेवरील अनेक वर्षांच्या तणावानंतर संबंध पूर्ववत करण्याचे प्रयत्न भारत आणि चीनकडून सुरू असल्याने या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने काय माहिती दिली?
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांनी आपल्या संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहावं, यावर पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांनी सहमती दर्शवली. तसेच संवादाद्वारे मतभेद हाताळताना सहकार्याची क्षेत्रे विस्तारण्याच्या गरजेवरही भर देण्यात आला आहे.
#WATCH | Delhi: During the bilateral meeting with Chinese President Xi Jinping, PM Narendra Modi says, "I express my gratitude for the support and cooperation received from China during India's BRICS chairmanship. We now have the opportunity to discuss bilateral cooperation. Once… pic.twitter.com/f0Zdc4ZPIq
— ANI (@ANI) September 12, 2026
“मतभेदांचं रूपांतर वादात होऊ नये”, असं परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे. आशियातील या दोन प्रमुख शक्तींमधील संबंध, परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हित, या तीन तत्त्वांवर आधारित असावेत, यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
‘भारत अन् चीनवर मोठी जबाबदारी’ : जिनपिंग
पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटलं की, “आज जग विविध बदलांतून जात आहे, आव्हानं वाढत आहेत. अशा वेळी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले दोन देश आणि ‘ग्लोबल साउथ’चे प्रमुख सदस्य म्हणून भारत आणि चीनवर मोठी जबाबदारी आहे. आपल्या दोन्ही देशांनी मानवतेचं भविष्य आणि आपापल्या जनतेचं हित लक्षात ठेवलं पाहिजे”, असं शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे.
“आपल्याला ‘ब्रिक्स’ मंचावर प्रभावीपणे एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे. आपण अशा जगाचा पुरस्कार केला पाहिजे जिथे कोणत्याही एका देशाचं वर्चस्व नसेल. सर्व राष्ट्रांना समान अधिकार असतील. तसेच व्यापार आणि आर्थिक प्रगती अशा प्रकारे झाली पाहिजे की ज्यामुळे प्रत्येक देशाला लाभ होईल. असं केल्यानेच आपण जगभरात शांतता, स्थिरता आणि प्रगती साधू शकू”, असं शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे.
