गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहे. रशिया-युक्रेन हे दोन्ही देश एकमेकांच्या शहरांवर भीषण हल्ले करत आहेत. त्यामुळे या युद्धाचा जगावर गंभीर परिणाम होत आहे. रशिया-युक्रेन युद्ध थांबण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेतला होता. मात्र, ट्रम्प यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अद्यापही रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष कायम आहे.
या घडामोडी दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतात नुकतीच ब्रिक्स शिखर परिषद पार पडली आहे. या परिषदेदरम्यान रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चेत मदत करण्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दर्शवली असल्याचा दावा रशियाने केला आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या तयारीचं स्वागत केलं आहे. दरम्यान, ही घडामोड अशा वेळी समोर आली आहे जेव्हा जेव्हा रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता करार घडवून आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले प्रयत्न आतापर्यंत अयशस्वी ठरले आहेत.
दिमित्री पेस्कोव्ह यांनी काय दावा केला?
दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलं की, “ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चा घडवून आणण्यास मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. पुतिन यांनी मोदी आणि शी जिनपिंग यांच्या या तयारीचं स्वागत केलं आहे.”
दरम्यान, ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे तिन्ही नेते हसतमुख चेहऱ्याने एकमेकांचे हात धरून उभे असल्याचा एक फोटो समोर आला होता. या फोटोची जगभरात मोठी चर्चा देखील झाली. या दृश्यातून केवळ नेत्यांमधील परस्पर सामंजस्यच अधोरेखित झालं नाही, तर विस्कळीत होत चाललेल्या जागतिक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर एकजुटीचा संदेशही दिला गेला आहे.
मोदी, पुतिन अन् जिनपिंग यांच्या फोटोची जगभरात चर्चा
‘ब्रिक्स’ शिखर परिषदेमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग यांच्या या खास फोटोची चर्चा होत आहे. हा फोटो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यानचा आहे. या फोटोत पंतप्रधान मोदी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मध्ये उभे असल्याचं दिसत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी हे व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. या फोटोत तिनही नेत्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे. मोदी, पुतिन आणि जिनपिंग यांच्या या खास फोटोमधून काही संदेश देण्याचा प्रयत्न आहे का? याची देखील चर्चा होत आहे.
