PM Modi Saptadhara Viksit Bharat 7 Streams : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केलं. २०४७ सालापर्यंत भारताला विकसित भारत बनण्याचं त्यांनी उद्दिष्ट्य ठेवलं असून त्याकरता स्वप्न, सामर्थ्य आणि संकल्पनांवर सर्वाधिक भर दिला. मोठी स्वप्न पाहून मोठ्या संकल्पना साकार करूयात, असं आवाहन करत त्यांनी गेल्या १२ वर्षांत सरकारने देशातील नागरिकांसाठी राबवलेल्या योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पिवळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची बांधणी नक्षी असलेल्या लाल रंगाच्या फेट्यानेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

“आज आपण सर्व ८० वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. आज प्रत्येकाच्या हृदयाची स्पंदने वंदे मातरमच्या शब्दांनी गुंजत आहे. आज हर घर तिरंगा आणि हर मन तिरंगा आहे. आणि देश उत्साह आणि उमंगासह नव्या संकल्पांना घेऊन पुढे जात आहे. तुम्हा सर्वांना स्वतंत्रता दिनाच्या खूप शुभेच्छा. देश आज त्या महान सुपूत्रांचं स्मरण करते ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग, बलिदानाची पराकाष्टा केली. आपल्या त्याग आणि बलिदानामुळे स्वातंत्र्याचं एकमेव लक्ष्य ठेवून संपूर्ण आयुष्य घालवलं. पूज्य बापूसहित सर्व स्वातंत्र्यसेनांनीना, महान क्रांतीकारींना आज मी श्रद्धापूर्वक नमन करतो”, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात, सर्वांगीण राष्ट्रीय विकास आणि आत्मनिर्भरता साधण्यासाठी सप्तधारा (सात प्रवाह) संकल्पनेची रूपरेषा मांडली. यामध्ये उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्टता (खर्च, गुणवत्ता आणि प्रमाण), शेती/अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान नवोपक्रम, गतीशक्ती कनेक्टिव्हिटी, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता, हरित आणि नील अर्थव्यवस्थांना चालना आणि जागतिक सॉफ्ट पॉवर (योग, आरोग्यसेवा, पर्यटन आणि सर्जनशील कला) यांचा समावेश आहे. या सुधारणांमध्ये युवक महत्त्वाची भूमिका बजावतील, असं ते म्हणाले. त्यांनी प्रशिक्षणासाठी देशव्यापी प्रतिभा शोध मोहिमेची घोषणाही केली.

सप्तधारांविषयी बोलताना ते म्हणाले, “आपल्याला सुधारणांचा वेग वाढवायची गरज आहे. ही कोणतीही सक्ती किंवा केवळ गाजणारा शब्द नाही, तर हा आमचा ठाम विश्वास आहे. आपण सुधारणांच्या एक्सप्रेसवर स्वार आहोत. आपण पुढील स्तरावरील सुधारणांच्या दिशेने वाटचाल करत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, मला त्या काळाकडेही मागे वळून पाहायचं आहे, जेव्हा आपल्याला भारताची स्वावलंबिता ‘सप्तसिंधू’ म्हणून माहीत होती. येत्या पाच-सात वर्षांत आपल्याला ‘सप्तधारा’ – सात प्रवाहांच्या विचाराने पुढे जायचे आहे.”

पंतप्रधान मोदींनी कोणत्या सप्तधारा सांगितल्या?

  • उत्पादन : “आम्हाला घटकांपासून ते मोठ्या उत्पादनापर्यंत संपूर्ण मूल्य साखळी तयार करायची आहे. उत्पादन क्षेत्रासाठी मला तीन गोष्टींवर भर द्यायचा आहे: खर्च, गुणवत्ता आणि प्रमाण. आपल्याला जागतिक मानके गाठायची आहेत. आपले कारखाने स्पर्धात्मक असले पाहिजेत, उत्पादने वापरकर्त्यांसाठी सुलभ असावीत, पॅकेजिंगने जगभरातील लोकांना आकर्षित केलं पाहिजे, अचूकता आणि शून्य-दोष उत्पादन ही आपली ओळख बनली पाहिजे. आपण गुणवत्तेसाठी ओळखले गेलो पाहिजे, हेच आपलं ओळखपत्र बनलं पाहिजे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
  • शेती आणि अन्न प्रक्रिया : पंतप्रधान मोदींनी विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी कृषी आणि शेती क्षेत्रातील क्षमतेवर विशेष भर दिला.
  • तंत्रज्ञान आणि नाविन्यता : “आजचं युग हे अंतराळ, क्वांटम आणि रोबोटिक्सचं आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान आपल्यासमोर आव्हाने उभी करत आहे. आपल्याला एक नाविन्यता केंद्र बनावं लागेल. डिजिटल सार्वजनिक तंत्रज्ञान जगापर्यंत पोहोचवलं पाहिजे. मेड इन इंडिया ६जी (6G) प्रत्येक कोपऱ्यात पोहोचलं पाहिजे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
  • गतिशक्ती : पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताकडे अखंड आणि वेगवान कनेक्टिव्हिटी आहे आणि शहरे हाय-स्पीड रेल्वे, मोडल हायवे, अंतर्गत जलमार्ग आणि मल्टी-मोडल लॉजिस्टिकद्वारे जोडण्याची गरज आहे. बंदरांवर आधारित विकासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
  • रक्षा शक्ती : “जेव्हा प्रत्येकजण स्वतःचा विचार करत आहे, अशा वेळी संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होणं ही काळाची गरज आहे. आपल्याला ड्रोन, हायपर-सॉनिक तंत्रज्ञान विकसित करावं लागेल. तरुणांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा प्रभावी वापर करावा लागेल,” असे ते म्हणाले.
  • हरित आणि नील अर्थव्यवस्था : पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला हरित गतिशीलता आणि हरित उत्पादन साध्य करण्याची गरज आहे. “आपल्याला जागतिक तापमानवाढीवर जगाला उपाय द्यावे लागतील. किनारपट्टीवरील पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय या माध्यमातून नील अर्थव्यवस्थेत आपल्याला अनेक संधी उपलब्ध आहेत”, असं ते म्हणाले.
  • सॉफ्ट पॉवर : “सातवी धारा ज्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे ती म्हणजे सॉफ्ट पॉवर. योगाने जगाला जोडले आहे, ही आपली ऊर्जा आहे. आपल्याकडे सर्वांगीण आरोग्य सेवा आहे, आपल्याला ‘हील इन इंडिया’ चा अधिक विस्तार करायचा आहे. आपण चित्रपट, सर्जनशील जग आणि गेमिंग दिले आहे, आपण सर्जनशील जगात आपले कौशल्य दाखवू शकतो. आपल्याकडे १०० हून अधिक राष्ट्रीय उद्याने आहेत, परंतु जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत. आपल्यात हे करण्याची क्षमता आहे. कॉन्सर्ट इकॉनॉमी वाढत आहे, प्रत्येक कलाकाराला भारतात यायचं आहे आणि आपण यासाठी त्यांना सक्षम केलं पाहिजे”, असं त्यांनी पुढे सांगितले.