PM Modi Zero Tolerance Terrorism : गेल्याकाही दिवसांपासून सीमापार सुरू असलेल्या दहशतावदी कारवायांविरोधात भारताने सातत्याने कठोर भूमिका घेतली आहे. दहशतवादाविरोधात भारत शून्य सहनशीलता धोरण पाळत असल्याचं सातत्याने सांगितलं जातं. आज पुन्हा मन की बात कार्यक्रमातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

सीमापार दहशतवादाला देशाने दिलेल्या चोख प्रत्युत्तराचे उदाहरण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून दिली. त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या १३८ व्या भागात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकने दहशतवादाला उत्तर देण्याचा भारताचा संकल्प जगासमोर दाखवून दिला. या मोहिमेच्या १० व्या वर्धापनदिनाच्या एक दिवस आधी त्यांनी हे वक्तव्य केले.

ऐतिहासिक कामगिरीला १० वर्षे पूर्ण

“आज भारत दहशतवादाविरुद्ध शून्य-सहनशीलता धोरण अवलंबत आहे आणि या दृष्टिकोनाचे परिणामही आपल्याला पाहायला मिळत आहेत”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी या सर्जिकल स्ट्राईकचं वर्णन एक “मोठी ऐतिहासिक कामगिरी” म्हणून केलं, ज्याला आता १० वर्षे पूर्ण होत आहेत. या मोहिमेची आठवण काढत पंतप्रधान मोदी म्हणाले, “दहा वर्षांपूर्वी, २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता.”

ते म्हणाले की, भारतीय सैनिकांनी ज्या प्रकारे नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादाविरुद्ध कारवाई केली, त्याने संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले होते. “सर्जिकल स्ट्राईकने भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचे एक नवे उदाहरण संपूर्ण जगासमोर धैर्याने मांडलं”, असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींनी या मोहिमेचे वर्णन दीर्घकाळापासून दहशतवादी हल्ल्यांमुळे सोसाव्या लागलेल्या त्रासाला दिलेले चोख उत्तर म्हणूनही केले. ते म्हणाले, “दहशतवादी हल्ल्यांमुळे भारताने दीर्घकाळ सोसलेल्या यातनांना आमचे हे निर्णायक उत्तर होते.” १८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथील लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेपलीकडे (LoC) हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. या मोहिमेत नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांच्या लाँच पॅडला लक्ष्य करण्यात आले होते.’

साखळी स्फोट ही सामान्य बाब बनली होती

पंतप्रधान मोदींनी भारताच्या दहशतवादाविषयीच्या भूमिकेचा संदर्भ देताना देशातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची आठवण करून दिली. “दहशतवादी हल्ल्यांनी भारताला प्रदीर्घ काळ जखमा दिल्या आहेत. एक काळ असा होता जेव्हा भारतात साखळी स्फोट होणं ही एक सामान्य बाब बनली होती”, असं ते म्हणाले. त्यांनी १३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत झालेल्या मालिकास्फोटांचा आणि २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा (२६/११) उल्लेख केला.