कानपूर :सरधोपट मार्ग सोडून आव्हानांचा स्वीकार करावा आणि येत्या २५ वर्षांत आपल्याला जसा देश पाहिजे आहे, त्यासाठी काम सुरू करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयआयटीच्या पदवीधरांना केले. देशघडणीच्या कार्यात आतापर्यंत आपण खूप वेळ वाया घालविला आहे, अशी खंतही मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूरच्या ५४ व्या पदवीदान समारंभात मोदी बोलत होते. तरुणांनी देशाची धुरा आता आपल्या खांद्यावर घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मोदी म्हणाले की, स्वातंर्त्यप्राप्तीनंतर भारतानेही आपला नवा प्रवास सुरू केला आहे. त्यानंतर २५ वर्षांच्या काळात देश स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी मोठे काम व्हायला पाहिजे होते, पण बराचसा वेळ वाया घालविण्यात आला. देशाचा खूप वेळ वाया गेला. या दरम्यान दोन पिढय़ा गेल्या, पण आता आपल्याला एक क्षणही वाया घालवून चालणार नाही. देशाच्या विकासाची आघाडी आता तरुणांना सांभाळावी आणि योग्य मार्गाने आपले काम सुरू करावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

यावेळी पंतप्रधानांनी ब्लॉकचेन आधारित पदवी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना बहाल केली. समारंभाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

देशाला दिशा देण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. येत्या २५ वर्षांचा विचार यात असला पाहिजे. देशाला गती देण्यासाठी हे व्हायला पाहिजे.        -पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>