नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ एप्रिलला देशाला उद्देशून संबोधन करताना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले असा आरोप करत त्याची चौकशी केली जावी अशी मागणी करणारे पत्र सोमवारी ७००पेक्षा अधिक नागरिकांनी निवडणूक आयोगाला लिहिले. त्यामध्ये माजी सरकारी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, कार्यकर्ते आणि पत्रकारांचा समावेश आहे.
पंतप्रधानांचे भाषण दूरदर्शन, संसद टीव्ही आणि आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आले होते. हे भाषण पक्षीय प्रचारासाठी केलेले होते असा आरोप या नागरिकांनी केला आहे. सध्या विधानसभा निवडणुकांमुळे पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये आदर्श आचारसंहिता लागू आहे.
दिल्लीचे माजी नायब राज्यपाल, राजकीय अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर, कार्यकर्ते योगेंद्र यादव, अर्थतज्ज्ञ जयती घोष, संगीतकार-लेखक टी. एम. कृष्णा, माजी केंद्रीय सचिव ई. ए. एस. सरमा, कार्यकर्ते हर्ष मंदर, पत्रकार परंजॉय गुहा ठाकुर्ता, शिक्षणतज्ज्ञ झोया भासद हसन आणि माजी मंत्री मदबसाद हसन यांच्यासह अन्य प्रतिष्ठित नागरिकांच्या या पत्रावर सह्या आहेत.
