पीटीआय, जगदलपूर (छत्तीसगड)
देशातील हिंदूंमध्ये कसेही करून फूट पाडून भारताचा नाश करण्याचा काँग्रेसचा हेतू असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी येथे केला. ते म्हणाले की, माझ्यासाठी गरीब ही सर्वात मोठी जात आणि सर्वात मोठी लोकसंख्या आहे.




जातनिहाय जनगणनेच्या विरोधी पक्षांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी टीका करताना काँग्रेसला लक्ष्य केले. बस्तर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जगदलपूर येथे भाजपच्या ‘परिवर्तन महासंकल्प सभे’ला संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर लोकशाहीची ‘लूटशाही’ आणि ‘घराणेशाही’मध्ये रूपांतर केल्याचाही आरोप केला.
हेही वाचा >>>“तुमच्या ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलवा, नाहीतर…”, भारताचा कॅनडाला इशारा; निज्जर हत्या प्रकरण चिघळणार?
काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवताना मोदींनी देशाचा प्रमुख विरोधी पक्ष त्यांचे नेते चालवत नसून पडद्यामागील लोक ‘देशविरोधी शक्तीं’शी संगनमत करून चालवत असल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, की कालपासून काँग्रेस पक्ष वेगळाच सूर आळवू लागला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क मिळाले पाहिजेत, अशी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. मी म्हणतो, की या देशात जर सर्वात जास्त लोकसंख्या गरीबांची आहे. त्यामुळे सर्वात मोठय़ा संख्येने असलेले गरीब लोकसंख्येचे कल्याण करणे, हेच माझे ध्येय आहे. गेल्या दहा वर्षांत आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांमुळे गरिबांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण झाल्याचा दावा करून मोदी म्हणाले, की माझ्यासाठी गरीब ही या देशातील सर्वात मोठी जात आहे. हाच सर्वात मोठा समुदाय आहे. गरिबांचे कल्याण झाले तर देशाचे आपोआप कल्याण होईल.
‘काँग्रेसला मुस्लिमांचे हक्क घटवायचे आहेत का?’
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की ‘‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या मुद्दय़ावर काय विचार करत असतील? मनमोहन सिंग सांगायचे, की देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे आणि त्यात मुस्लिमांचाही पहिला हक्क आहे. मात्र आता कोणाला किती अधिकार-हक्क मिळणार हे लोकसंख्येचे प्रमाण ठरवेल, असा काँग्रेसचा आग्रह आहे. याचा अर्थ काँग्रेसला मुस्लिमांचे हक्क कमी करायचे आहेत का, असा सवालही त्यांनी केला. काँग्रेसच्या दाव्यानुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंनी आता पुढे येऊन त्यांचे सर्व हक्क हिरावून घ्यावेत का? काँग्रेसला अल्पसंख्याकांना हटवायचे आहे का?’’
हेही वाचा >>>“हिंमत असेल तर ‘योगींना’ कॉल करा”; कारला दंड ठोठावल्याने एका हिंदू गटाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, VIDEO व्हायरल
‘देशविरोधी शक्तींच्या हाती काँग्रेसची सूत्रे!’ काँग्रेस पक्षाची सूत्रे आता काँग्रेस नेत्यांच्या हाती नाहीत. कारण त्यांचे ज्येष्ठ नेते मौन राखून बसले आहेत, असा आरोप करून मोदी म्हणाले, की आता देशविरोधी शक्तींशी संगनमत असलेल्या लोकांकडून पडद्यामागून काँग्रेसची सूत्रे हलवली जात आहेत. काँग्रेस कोणतीही किंमत मोजून देशातील हिंदूंमध्ये फूट पाडून भारताला नष्ट करू इच्छिते. काँग्रेसला गरिबांमध्ये फूट पाडायची आहे. काँग्रेसने अन्य कोणत्याही देशासोबत केलेला गुप्त कराराचा खुलासा केलेला नाही. त्यानुसार काँग्रेसला भारतविरोधी बोलण्यात मजा येत आहे. भारताबद्दलच्या चांगल्या गोष्टी वाईट पद्धतीने मांडण्यात आनंद मिळत आहे. त्याचे देशावरील प्रेम आटलेले दिसते.