Donald Trump praising PM Modi: अमेरिकेचे निवृत्त कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटले की, पंतप्रधान मोदी युद्धविराम घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अमेरिकेच्या माजी लष्कर अधिकाऱ्याने मोदींवर विश्वास व्यक्त करताच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “पंतप्रधान मोदी आणि मी अशा व्यक्ती आहोत, ज्या कामे मार्गी लावतात”, असे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचा हा संदेश भारतातील अमेरिकी दूतावासाने त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. एक महिन्यापासून चाललेला मध्यपूर्वेतील संघर्ष आणि इराणवर अमेरिकेच्या जमिनीवरील हल्ल्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दूतावासाने प्रसिद्ध केलेली ही टिप्पणी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
अमेरिकन दूतावासाने ट्रम्प यांच्या विधानाचा दाखला देताना म्हटले, “भारताबरोबरचे आमचे संबंध पुढील काळात आणखी बळकट होत जातील. पंतप्रधान मोदी आणि मी असे व्यक्ती आहोत, जे कामे मार्गी लावतो. ही गोष्ट अनेकांबद्दल म्हणता येत नाही.
मंगळवारी (दि. २४ मार्च) पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवरून संवाद साधला होता. भारत पश्चिम आशियातील तणाव कमी करून शक्य तितक्या लवकर शांतता प्रस्थापित करण्याचे समर्थन करत असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मांडली होती.
होर्मुझ सामुद्रधुनीच्या संरक्षणाबद्दल चर्चा
या चर्चेत सागरी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीचे संरक्षण आणि ती खुली ठेवण्यावर भर देण्यात आला. ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना पश्चिम आशियातील परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. भारत तणाव कमी करून शांतता लवकरात लवकर प्रस्थापित व्हावी, यासाठी समर्थन देतो. होर्मुझ सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि सर्वांसाठी उपलब्ध राहणे जगासाठी अत्यंत आवश्यक आहे. शांतता आणि स्थैर्यासाठी प्रयत्नांबाबत आम्ही संपर्कात राहण्याचे ठरवले आहे, असे मोदी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे ऐकू शकतात
इराणबरोबर सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल संघर्षाचा तणाव कमी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णायक भूमिका बजावू शकतात, असे विधान अमेरिकेचे निवृत्त कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
युद्धविरामाबाबत बोलताना डग्लस मॅकग्रेगर म्हणाले की, जर भारताने मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे म्हणणे ऐकून घेण्याची शक्यता आहे. भारताच मध्यस्थाची भूमिका का पार पाडू शकतो, यावर बोलताना मॅकग्रेगर म्हणाले की, मी भारताची निवड करण्याचे कारण म्हणजे मला वाटते की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या टप्प्यावर पंतप्रधान मोदींचेच ऐकू शकतात.
