पीटीआय, गोगामुख, बेहाली

आसामात जर काँग्रेस सत्तेत आली तर ते घुसखोरांच्या संरक्षणासाठी कायदा करतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला. तथापि, भाजप आणि सहकारी पक्ष तसे होऊ देणार नाहीत, असे ते धेमाजी जिल्ह्यातील सभेत बोलताना ते म्हणाले. “बहुसंख्याक समाजाचे अल्पसंख्याकांमध्ये रूपांतर करणे आणि घुसखोरांची एक स्थायी मतपेढी उभारणे हेच काँग्रेसचे लक्ष्य आहे,’’ असा आरोप पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले की, २०१४ मध्ये भाजप सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसने केंद्रात नवा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता, तथापि रालोआने त्यास विरोध केला होता. काँग्रेस नेते घुसखोरांचे समर्थन करीत असून घुसखोरांच्या संरक्षणासाठी आसामात कायदा आणणार असल्याचे जाहीररीत्या सांगत असल्याचा दावा त्यांनी केला. बिस्वनाथ जिल्ह्यातील बेहाली येथे आणखी एका सभेत बोलताना

काँग्रेस विकासविरोधी आणि भ्रष्टाचाराची जननी असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. काँग्रेसने आसामचा आत्मा, अभिमान, अस्मिता आणि सुरक्षा यांच्याशी तडजोड केली असल्याचा आरोपदेखील पंतप्रधानांनी केला.

काँग्रेससाठी दोन कुटुंबे आहेत – एक दिल्लीत आणि दुसरे आसाममध्ये. जनकल्याणाला त्यांचे प्राधान्य नसून या दोन कुटुंबांच्या कल्याणाला आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘एकाच कुटुंबाकडून आसामची लूट’

नाझिरा, टिंगखोंग : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी बुधवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्लाबोल केला. साधनसंपन्न राज्यात फक्त एकच कुटुंब सर्व काही लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या गुलामगिरीत गुंतले आहेत आणि हिमंता बिस्वा शर्मा मोदींच्या गुलामगिरीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

भाजपच्या नेतृत्वातील सरकार लोकांना घाबरवून कारभार चालवत आहे. विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे उमेदवार देबब्रता सैकिया यांच्या समर्थनार्थ नाझिरा येथे एका निवडणूक सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेचे ‘गुलाम’ असल्याचा आरोप करत हल्ला चढवला. एकाच कुटुंबाकडून आसाममध्ये लूटमार सुरू असून खाणी, जमिनी आणि प्रत्येक मालमत्ता मोठ्या उद्योगपतींच्या ताब्यात दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.