Anthony Albanese PM Modi Selfie inside Melbourne Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून मेलबर्नमधील मार्व्हल स्टेडियममध्ये गुरूवारी त्यांनी अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. यावेळी स्टेडियममध्ये ३०,००० लोकांची उपस्थिती होती. यावरून ‘ये शो हाऊसफुल है’, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली. या सोहळ्याची प्रसिद्धी पाहून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना पंतप्रधान मोदींबरोबर सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरचा दाखला देत भारताची लष्करी क्षमता वाढली असल्याचे अधोरेखित केले.
पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने दहशतवादाला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेले चोख प्रत्युत्तर याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियातील सभेत केला. भारताने केलेली लष्करी कारवाई हा दहशतवादाच्या विरोधातील आमची ठाम भूमिका संपूर्ण जगाला कळली आहे. भारताच्या सशस्त्र दलाची क्षमता आणि ताकद आता संपूर्ण जगाला कळली आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
“ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या ठिकाणांना कशाप्रकारे उध्वस्त केले, हे तुम्ही पाहिले असेल. त्याचा प्रतिध्वनी जगभरात उमटला. भारताकडून जेव्हा दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणारे हल्ले होतात, तेव्हा तुम्हाला अभिमान वाटत नाही का?”, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी उपस्थित लोकांना विचारला.
भारताच्या प्रगतीचा आलेख मांडला
पंतप्रधान मोदी भारताच्या विकासाबाबत बोलताना म्हणाले, २१ व्या शतकात भारताने विकसित देश बनण्याच्या दृष्टीने आश्वासक असा प्रवास सुरू केला आहे. मेक इन इंडियाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना आता जगभरात ओळख मिळत आहे, तसेच त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
अल्बानीज यांचा मोदींबरोबर सेल्फी
दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान मोदींबरोबर सेल्फी घेतला. एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “ऑस्ट्रेलिया आणि भारतीय व्यवसायांना सहकार्य करत आपण एकत्रितपणे अर्थव्यवस्थेचा विकास करत आहोत. व्यावसायिक यशोगाथेद्वारे दोन्ही देशातील लोकांमध्ये वेगळ्याच प्रकारचे बंध निर्माण झाले आहे. हे संबंध आणखी दृढ व्हावेत, यासाठी आपण पुढेही कार्यरत राहू.”
