नवी दिल्ली : तंत्रज्ञान तसेच, मौल्यवान खनिजांच्या ‘शस्त्रीकरणा’मुळे आपल्या सामूहिक विकासाला मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ब्रिक्स शिखर परिषदेत दिला. तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचा वापर सर्वसमावेशक असावा, अशी भूमिका मोदींनी मांडली.
‘ब्रिक्स’च्या ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता’ या विषयावरील सत्रात मोदी यांनी जागतिक पुरवठा साखळी अधिक सक्षम आणि विश्वासार्ह करण्याची गरज व्यक्त केली. तंत्रज्ञान किंवा मौल्यवान खनिजांचा वापर एखाद्या देशावर आर्थिक किंवा सामरिक दबाव आणण्यासाठी झाल्यास त्याचा परिणाम केवळ संबंधित देशावर होत नाही, तर जागतिक विकासावरही होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मौल्यवान खनिजे ही स्वच्छ ऊर्जा, ऊर्जासुरक्षा आणि नव्या तंत्रज्ञानासाठी अत्यावश्यक बनली आहेत. त्यामुळे या खनिजांची पुरवठा साखळी विश्वासार्ह, विविधतापूर्ण, टिकाऊ आणि न्याय्य असणे आवश्यक असल्याचे ‘ब्रिक्स’च्या नवी दिल्ली घोषणापत्रातही नमूद करण्यात आले आहे.
जगातील वाढते संघर्ष, महामारी, हवामान संकट आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा सर्वाधिक परिणाम ‘ग्लोबल साऊथ’मधील देशांवर होत असताना जागतिक निर्णय प्रक्रियेत मात्र त्यांचे प्रतिनिधित्व कमी आहे. त्यामुळे जागतिक व्यवस्थेत सुधारणा करून ‘ग्लोबल साऊथ’ला निर्णय प्रक्रियेत अधिक प्रभावी स्थान देण्याची गरज आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.
आज कोणतेही संकट एका प्रदेशापुरते मर्यादित राहत नाही. त्यामुळे संकटांची वेळेवर ओळख, पूर्वतयारी आणि तातडीने कारवाई यावर भर देण्याची गरज मोदी यांनी व्यक्त केली. संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी ब्रिक्स एकात्मिक पूर्वसूचना व्यवस्था उभारण्यावर सहमती झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी पूर्वसूचना माहितीच्या एकत्रीकरणाची मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. तसेच पुरवठा साखळी अधिक विश्वासार्ह आणि सक्षम करण्यासाठी सहकार्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
‘ब्रिक्स’ सरकारांपुरते मर्यादित नको
‘ब्रिक्स’चे सहकार्य केवळ सरकारांपुरते मर्यादित न राहता उद्योजक, शेतकरी, संशोधक, महिला, युवक आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे मोदी म्हणाले. कौशल्यविकास, रोजगारक्षमता, महिलांचा रोजगारातील सहभाग, सामाजिक सुरक्षा आणि क्षमता विकासासाठी ‘ब्रिक्स कनेक्ट’ उपक्रम राबविण्यात येत आहे. छोट्या उद्योगांना ज्ञान, अर्थसाहाय्य आणि नव्या बाजारपेठांशी जोडण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग सहकार्य पोर्टल सुरू करण्यात आले आहे. शहरांमधील चांगल्या पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी नागरी वाहतूक केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीसाठी वापर
नवोन्मेषाच्या क्षेत्रात ब्रिक्समधील नवउद्योग आणि नवउद्योग-विकास केंद्रांना जोडण्यासाठी जाळे उभारण्यात येणार आहे. ब्रिक्स नवउद्योग नवोन्मेष निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. डिजिटल शेतीच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता, भौगोलिक माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा शेतकर्यांच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकासावर भर
विकास आणि पर्यावरण हे परस्परविरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत, असे मोदी यांनी सांगितले. स्मार्ट वीजजाळे आणि ऊर्जा साठवणुकीसाठी ‘ब्रिक्स डिजिटल उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक शेती आणि पुनरुज्जीवित शेतीसाठी उत्कृष्टता केंद्रांच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक ज्ञानाचा हवामान बदलाशी लढण्यासाठी प्रभावी वापर करण्यावरही भर देण्यात आला आहे.
सांगता समारंभात ‘ग्लोबल साऊथ’ला आवाहन
१८व्या ब्रिक्स शिखर परिषदेची रविवारी सांगता झाली. ‘ब्रिक्स’च्या माध्यमातून झालेल्या सहकार्याचे रूपांतर आता ‘फाइलमधून प्रत्यक्ष कृतीत’ आणि ठोस परिणामांमध्ये झाले पाहिजे, असा संदेशही पंतप्रधान मोदींनी दिला. ‘ब्रिक्स’मधील सहकार्य केवळ बैठका, चर्चा आणि घोषणांपुरते न राहता सामान्य नागरिकांच्या जीवनात त्याचे परिणाम दिसले पाहिजेत, असा मोदींच्या समारोपाच्या संदेशाचा सूर होता. ‘ब्रिक्स’मधून विकसित होणारे उपाय केवळ सदस्य देशांपुरते मर्यादित न ठेवता ‘ग्लोबल साऊथ’च्या गरजांनुसार उपलब्ध आणि वापरण्यायोग्य असले पाहिजेत, असेही मोदी म्हणाले. ‘आपले भविष्य समान आहे, त्यामुळे ते घडविण्याचा अधिकारही समान असला पाहिजे,’ असा संदेश मोदींनी दिला.
