नवी दिल्ली : ‘ब्रिक्स’चे सहकार्य केवळ सरकारांपुरते मर्यादित न राहता उद्योजक, शेतकरी, संशोधक, महिला, युवक आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत म्हणाले. कौशल्यविकास, रोजगारक्षमता, महिलांचा रोजगारातील सहभाग, सामाजिक सुरक्षा आणि क्षमता विकासासाठी ‘ब्रिक्स कनेक्ट’ उपक्रम राबविण्यात येत आहे. छोट्या उद्योगांना ज्ञान, अर्थसाहाय्य, नव्या बाजारपेठांशी जोडण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग सहकार्य पोर्टल सुरू करण्यात आले. नागरी वाहतूक केंद्राचीही स्थापना करण्यात आली असल्याचे मोदींनी म्हटले.

एआयचा शेतीसाठी वापर

नवोन्मेषाच्या क्षेत्रात ब्रिक्समधील नवउद्योग आणि नवउद्योग-विकास केंद्रांना जोडण्यासाठी जाळे उभारण्यात येणार आहे. ब्रिक्स नवउद्योग नवोन्मेष निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. डिजिटल शेतीच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता, भौगोलिक माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकासावर भर

विकास आणि पर्यावरण हे परस्परविरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत, असे मोदी यांनी सांगितले. स्मार्ट वीजजाळे आणि ऊर्जा साठवणुकीसाठी ‘ब्रिक्स डिजिटल उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यात आले. पर्यावरणपूरक शेती आणि पुनरुज्जीवित शेतीसाठी उत्कृष्टता केंद्रांच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्नेहभोजनाला पुतिन उपस्थित

जिनपिंग यांच्याबरोबरच अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद हेही स्नेहभोजनाला उपस्थित नव्हते. ते परिषदेनंतर मायदेशी रवाना झाले. मोदी यांच्या स्नेहभोजनाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह ब्रिक्सच्या सदस्य देशांचे प्रमुख उपस्थित होते. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

‘ठीक आहात ना?’; भाषण थांबवून मोदींकडून जिनपिंग यांची विचारपूस

नवी दिल्ली : ब्रिक्स शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची विचारपूस केल्याच्या प्रसंगाने लक्ष वेधून घेतले. जिनपिंग काहीसे अस्वस्थ दिसत असल्याचे लक्षात आल्यानंतर शनिवारी मोदी यांनी क्षणभर भाषण थांबवून, ‘ठीक आहात ना?’ अशी विचारणा केली. मात्र, जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पंतप्रधान मोदी यांनी ब्रिक्स नेत्यांसाठी शनिवारी रात्री आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही जिनपिंग उपस्थित राहिले नाहीत. स्नेहभोजनाला जाण्याऐवजी ते हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी परतल्याचे सांगितले गेले.

आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये कायद्याच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी ग्लोबल साऊथने एकत्रितपणे काम करावे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वादांचे शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. – क्षी जिनपिंग, राष्ट्राध्यक्ष, चीन