राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूबी हॉल क्लिनिक या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्यांना रूग्णालयातून आता घरी सोडण्यात आलं आहे आणि विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची फोनवरून विचारपूस केली आणि सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू तुमचे आशीर्वाद असू द्या असं म्हटलं आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी ही माहिती दिली आहे. विठ्ठल मणियार यांनी शरद पवार यांची प्रकृती कशी आहे? याबाबतही माहिती दिली यानंतर आता राजकीय चर्चाही सुरू झाल्या आहेत.

विठ्ठल मणियार यांनी माध्यमांना काय सांगितलं?

“सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साहेबांच्या प्रकृतीसंदर्भात फोन केला होता. त्यांनी अत्यंत आदरपूर्वक शरद पवार यांची चौकशी केली. प्रकृतीबाबत विचारपूस केली. नरेंद्र मोदी आज शरद पवार यांना म्हणाले की सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू तुम्ही प्रकृती सांभाळा, विश्रांती घ्या. असं नरेंद्र मोदी शरद पवार यांना म्हणाले आहेत. विश्रांती घेण्याची विनंती आहे असं मोदींनी शरद पवार यांना सांगितलं. ज्यावर शरद पवार यांनी होय मी विश्रांती घेतो आहे. आपण सगळे असल्यानंतर मला देशाची चिंता नाही असं सांगितलं. तसंच नरेंद्र मोदींचे शरद पवार यांनी आभारही मानले फोन केल्याबद्दल.” असं विठ्ठल मणियार यांनी म्हटलं आहे.

विठ्ठल मणियार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत काय माहिती दिली?

ANI शी बोलताना विठ्ठल मणियार यांनी सांगितलं की, “डॉक्टरांनी शरद पवारांना सांगितलं आहे की, दौरे कमी केले पाहिजेत. प्रवास कमी केला पाहिजे, त्याच्यात थोड्या मर्यादा आणल्या पाहिजेत. प्रवासही कमी केले पाहिजे, दुसरं त्यांनी डाएट व्यवस्थित घेतला पाहिजे, ते खाण्याच्या बाबतीत फार दक्षता घेत नाहीत, त्यांना सांगावं लागतं हे खा, ते खा, ऑपरेशन झाल्यानंतर साहेबांना लिक्वीड डाएट घ्यावं लागतं, लिक्वीड डाएट घेऊन माणूस कंटाळतो, सारखं तेच तेच. आता थोडा थोडा बदल होतो आहे, दुधासोबत भाकरी वगैरे खात आहेत, त्यामुळे आता हळूहळू त्यांचा अशक्तपणा कमी होईल, त्यांनी दोन चार दिवस आराम केला पाहिजे” असंही विठ्ठल मणियार यांनी म्हटलं आहे.

सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार आराम करणार

शरद पवार यांना छातीत कफ झाला होता. तसंच त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता प्रकृती बरी झाल्याने शरद पवारांना घरी सोडण्यात आलं आहे. रुग्णालयातून पवार बारामतीच्या घरी जातील, अशी चर्चा होती. मात्र, पवार थेट मुंबईला निघाले आहेत. त्यांच्यासह सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. शरद पवार मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी आराम करणार आहेत अशीही माहिती समोर आली आहे.