देशात बुधवारी करोनाच्या १,१३४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून ७,०२६ झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. यात करोनासह एच१एन१, एच३एन२ या विषाणूंमुळे आलेल्या तापाच्या साथीचाही आढावा घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी करोनाची जगभरातील स्थिती आणि देशातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत माहिती दिली. तसेच २२ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या यापूर्वीच्या आढावा बैठकीचा कृती अहवालही या वेळी सादर करण्यात आला. करोनाची २० मुख्य औषधे, १२ अन्य औषधे, आठ प्रतिबंधक औषधे आणि तापाच्या एका औषधाच्या साठय़ाबाबत आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशभरातील प्रयोगशाळांमध्ये जनुकीय क्रमनिर्धारणाचे प्रमाण वाढवावे, जेणेकरून करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूंची माहिती वेळेत मिळून योग्य ती कार्यवाही करता येईल, अशी मुख्य सूचना पंतप्रधानांनी केली. याखेरीज सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनाही सज्ज राहण्याचे आदेश त्यांनी दिले.
‘एक्सबीबी.१.१६’मुळे रुग्णवाढ
करोनाच्या ‘एक्सबीबी.१.१६’ या नव्या उत्परिवर्तित प्रकारामुळे रुग्णवाढ होत असावी, असा अंदाज ‘एम्स’चे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला. मात्र, या प्रकाराची तीव्रता कमी असल्यामुळे रुग्ण दगाविण्याची शक्यता कमी असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले. जोवर तीव्र आजार, रुग्णालयात भरती होणे व मृत्यूचे प्रमाण वाढत नाही, तोपर्यंत काळजी करण्याचे कारण नाही. लोकांना सौम्य आजार असल्यास त्यांची प्रतिकारक्षमता काही प्रमाणात वाढू शकते असे डॉ. गुलेरिया म्हणाले.
पाच जणांचा मृत्यू
बुधवारी सकाळी ८ वाजता अद्ययावत झालेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत करोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात आणि केरळमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा बळी गेला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा ५ लाख ३० हजार ८१३वर पोहोचला आहे.
पंतप्रधानांच्या सूचना
* सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा
* साथ पसरू नये, यासाठी योग्य काळजी घ्या
* करोनायोग्य वर्तनावर भर द्या
* सर्व श्वसनरोगांच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळा सज्ज ठेवा
* चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारणाबाबत सतर्क राहा
* करोना लसीकरणावर भर द्या