PM Narendra Modi congratulates Giorgia Meloni: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी युद्धानंतर इटलीचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषविण्याचा विक्रम केला आहे. ४ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या सरकारने १,४१३ दिवस पूर्ण केले. युद्धानंतरच्या काळात या पदावर राहणाऱ्या त्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या आहेत. हा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांचे कौतुक केले. इटलीच्या जनतेने मेलोनी यांच्या नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बेर्लुस्कोनी यांनी २००१ ते २००५ या काळात १,४१२ दिवस सत्तेवर होते. मेलोनी सरकारने त्यांच्यापेक्षा एक दिवस अधिक सत्तेवर राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

पंतप्रधान मोदी पोस्टमध्ये काय म्हणाले?

मेलोनी यांचे अभिनंदन व्यक्त करताना पंतप्रधान मोदी पोस्टमध्ये म्हणाले, “भारत आणि इटली यांच्यातील विशेष रणनैतिक भागीदारी आणखी बळकट होण्यासाठी आमच्या मैत्रीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांचे समृद्ध भविष्य घडवण्यासाठी आम्ही पुढेही सहकार्य सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत. पुढील यशासाठी माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा…”

८० वर्षांत इटलीत ६८ सरकार

दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ साली इटली गणराज्य म्हणून स्थापन झाले. त्यानंतर इटलीत राजकीय अस्थिरता होती. ८० वर्षांत इटलीत आतापर्यंत ६८ वेळा सरकार बदलले आहे. एका सरकारचा सरासरी कार्यकाळ १४ महिने इतका होता. २२ ऑक्टोबर २०२२ साली मेलोनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या होत्या. मेलोनी यांच्या सरकारला मोठा कार्यकाळ मिळाल्यामुळे इटलीला राजकीय स्थिरता प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे.

मेलोनी यांनीही दिल्या होत्या शुभेच्छा

जून २०२६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाचे ४३९९ दिवस पूर्ण केले होते. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम त्यांनी मोडीत काढला होता. यावेळी मेलोनी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या.