लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. आता सातव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. तर या लोकसभा निवडणुकीबरोबरच ओडीशा विधानसभेची निवडणूकही पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज ओडीशात जाहीर सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीजेडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “बीजेडी सरकारने लुटलेले पैसे हे कुठंही ठेवले तरी एक एक पैसा बाहेर काढला जाईल”, असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“बीजेडी पक्षावर ओडिशातील जनतेने २५ वर्षांपासून विश्वास ठेवला. मात्र, बीजेडीने क्षणाक्षणाला जनतेचा निश्वास तोडला. हेच बीजेडी सरकार येथील आदिवाशींची जमीन हडपण्यासाठी एक कायदा घेऊन आलं होतं. मात्र, भाजपाच्या दबावामुळे तो कायदा पुन्हा मागे घ्यावा लागला. केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही जिल्हा खनिज निधी म्हणून ओडिशाला हजारो कोटी रूपये निधी दिला. मात्र, बीजेडीने यामध्येही घोटाळा केला. आता लोक म्हणत आहेत की, यातील काही पैसा परदेशात गेला. पण मी सांगतो लुटलेले पैसे हे कुठेही ठेवले तरी एक एक पैसा बाहेर काढला जाईल, ज्यांनी जनतेला लुटलं त्यांना ते पुन्हा द्यावं लागणार, ही मोदींची गॅरंटी आहे”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

हेही वाचा : गांधी कुटुंबियांबरोबर संबंध कसे आहेत? पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘राहुल गांधींना फोन…’

“पैसे लुटणारे आयुष्यभर जेलमध्ये बसतील. जनतेला लुटण्याऱ्यांना सुट्टी दिली जाणार नाही. बीजेडी सरकारने सगळ्यात मोठा धोका महाप्रभु जगन्नाथांचं रत्न भंडार घेऊन केला आहे. आज फक्त ओडीशा नाही तर संगळा देश हे जाणून घेऊ इच्छित आहे. रत्न भांडारची चावी कुठं गेली? या प्रकरणाची जी चौकशी झाली होती, त्या चौकशीत कोणाचं नाव आलं होतं? हे बीजेडी सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. याचा खुलासा ओडीशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यावर केला जाईल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलं.

“गेल्या एक वर्षांपासून नवीन बाबूंची (नवीन पटनायक) तब्येत अचानक कशी बिघडली? त्यांच्या आसपास राहिलेले लोक मला भेटल्यावर त्यांच्या तब्येतीसंदर्भात सांगतात. आता नवीन बाबू स्वत: काहीही काम करत नाहीत. त्यांची तब्येत बिघडण्यात काही कटही असू शकतो. नवीन बाबूंची तब्येत खराब होण्यामागे काही षडयंत्र घडलं आहे का? हे जाणून घेण्याचा अधिकार येथील जनतेला आहे. मात्र, यामध्ये नवीन बाबू यांच्या सरकारमध्ये जे पडद्याच्या मागून सत्तेत आहेत, त्यांचा हात तर नाही ना?”, असा सवाल करत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

दरम्यान, “१० जूननंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर भाजपा सरकार एका समितीची स्थापना करेल आणि अचानक नवीन बाबू यांची तब्येत कशी बिघडली, याची चौकशी करेल”, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.