PM Narendra Modi Delhi Metro Travel SRCC Centenary Celebration: दिल्लीतील ‘श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स’च्या (एसआरसीसी) शताब्दी महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. नेहमीच्या व्हीआयपी ताफ्याऐवजी हातात मेट्रो कार्ड घेऊन सर्वसामान्यांप्रमाणे डब्यात शिरलेल्या पंतप्रधानांना पाहून सहप्रवाशांनाही धक्का बसला. या प्रवासादरम्यान मोदींनी मेट्रोतील नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या.
‘एसआरसीसी’च्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक टप्प्यावर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित या शताब्दी महोत्सवाला पंतप्रधान मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले.
या सोहळ्याच्या निमित्ताने महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, माजी प्राचार्य आणि प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने एकत्र आला आहे.
१३ वर्षांनंतर महाविद्यालयात परतले
पंतप्रधान मोदी तब्बल १३ वर्षांनंतर ‘एसआरसीसी’मध्ये पुन्हा आले आहेत. यापूर्वी २०१३ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या महाविद्यालयाला भेट दिली होती.
तत्पूर्वी शताब्दी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच यंदा एप्रिल महिन्यात महाविद्यालयाच्या नियामक मंडळाने पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते एसआरसीसीच्या १०० वर्षांच्या प्रवासाची नोंद घेणाऱ्या एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले होते.
पंतप्रधान मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते, आज सायंकाळी मी ‘एसआरसीसी’च्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार आहे. या महाविद्यालयाने आपला वेगळा ठसा उमटवत समाजातील अनेक लोकांना घडविण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.
