PM Modi Viral Video: : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. अनेक शहरात भव्य सभा, रॅली, बैठकांचा धडाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमध्ये सभा पार पडली.
या सभेनंतर पंतप्रधान मोदी यांचा ताफा झाडग्राम शहरातून जात असताना अचानक थांबला. त्यानंतर मोदी चक्क रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दुकानावर गेले आणि झालमुडीचा (तिखट भेळ) आस्वाद घेताना दिसून आले. या प्रसंगाचा व्हिडीओ पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नेमकं काय घडलं?
झाडग्राममधील एका सभेला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अचानक आपला ताफा थांबवला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्थानिक दुकानात पंतप्रधान मोदी गेले आणि त्या दुकानदाराला झालमुडी (तिखट भेळ) देण्याची विनंती केली. यावेळी तो दुकानदारही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. मोदींनी हा व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं की, “पश्चिम बंगालमधील चार सभांमधून वेळ काढून झाडग्राममध्ये स्वादिष्ट झालमुडीचा आस्वाद घेतला.”
मोदींनी त्या दुकानदाराशी काय संवाद साधला?
पंतप्रधान मोदी : चांगली झालमुडी किती रुपयांची असते?
दुकानदार : १० रुपयांची किंवा २० रुपयांची
पंतप्रधान मोदी : जे असेल ते बनवा.
त्यानंतर पंतप्रधान मोदींनी खिशातून पैसे काढले आणि दुकानदाराला १० रुपये दिले. पण दुकानदाराने पैसे घेण्यास नकार दिला. त्यानंतर मोदींनी पैसे घेण्याची विनंती केल्यानंतर दुकानदाराने पैसे घेतले.
पुन्हा दुकानदार : कांदा खाणार का?
पंतप्रधान मोदी : हो, कांदा खातो. मात्र, कोणाचं डोकं नाही.
ব্যস্ত রবিবারে পশ্চিমবঙ্গ জুড়ে চারটি জনসভার ফাঁকে, ঝাড়গ্রামে সুস্বাদু ঝালমুড়ি খেলাম। pic.twitter.com/VqIrc0zrmR
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2026
पंतप्रधानांचं मजेशीर उत्तर अन् एकच हशा
दरम्यान, पंतप्रधान मोदींना दुकानदाराने भेळ दिल्यानंतर मोदींनी दुकानदाराला पैसे देऊ केले. मात्र, दुकानदाराने पैसे घेण्यास संकोच केला. त्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “नाही दादा असं नसतं.” त्यानंतर मोदींनी खास त्यांच्या शैलीत म्हटलं की, “त्रास घेऊ नको दादा, पैसे घे.” त्यानंतर उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
