पीटीआय, नवी दिल्ली
देशाच्या शिक्षण क्षेत्राला जगातील अर्थव्यवस्थेशी जोडण्याच्या प्रक्रियेला गती देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ‘ऑटोमेशन’ यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
अर्थसंकल्पाविषयक एका परिषदेत मार्गदर्शन करताना, लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणे हेच सरकारचे ध्येय असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. त्यात शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, पर्यटन, क्रीडा आणि संस्कृती ही अशी क्षेत्रे आहेत जी या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माध्यम म्हणून काम करतात. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे हा केवळ एक विषय नसून, तो या सरकारचा मूळ संकल्प आहे, असेही ते म्हणाले. या परिषदेला विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी आणि खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.
‘देशात शिक्षणाला रोजगार आणि उद्योगाशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरण अशा अभ्यासक्रमाचा पाया रचते, जो बाजारपेठेतील मागणी आणि खर्या जगातील अर्थव्यवस्थेशी सुसंगत असणे आवश्यक आहे, विशेषत: एआय, ऑटोमेशन आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात. आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था खर्या अर्थव्यवस्थेशी जोडण्याच्या प्रक्रियेला वेग द्यावा लागेल,’ असे मोदी यांनी नमूद केले. शिक्षण, रोजगार आणि उद्योग यांच्यातील संबंधावर चर्चा करताना पंतप्रधानांनी ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला.
