भोपाळ : माझी प्रतिमा मलिन करण्याचा काही लोकांचा अट्टहास आहे, त्यांनी त्यासाठी देशात आणि देशाबाहेरच्या काहींशी संगनमत करून ‘सुपारी’ (कंत्राट) दिली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसचा नामोल्लेख टाळून केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ‘भारतातील लोकशाही धोक्यात’ हे ब्रिटनमधील वक्तव्य आणि त्यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर जर्मनीने त्यावर केलेले भाष्य यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी वरील वक्तव्य केले. भोपाळ-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर राणी कमलापती रेल्वे स्थानकात झालेल्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. 

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
congress leader rahul gandhi slams pm modi over electoral bond issue
निवडणूक रोखे हा खंडणीचा प्रकार; राहुल गांधी यांची टीका
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?

विरोधकांवर हल्ला करताना मोदी म्हणाले, ‘‘आपल्या देशात असे काही लोक आहेत ज्यांनी २०१४ पासून माझी प्रतिमा मलिन करण्याचा दृढनिश्चय केला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या लोकांना ‘सुपारी’ (कंत्राट) दिली आहे. त्यांना काही लोक देशातून पाठिंबा देत आहेत, तर काही देशाबाहेरून काम करत आहेत. हे लोक सातत्याने मोदींची प्रतिमा खराब करण्याचा आणि त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत आहेत.’’

देशातील गरीब, मध्यमवर्गीय, आदिवासी, दलित, मागासवर्गीय आणि प्रत्येक भारतीय नागरिक मोदींचे संरक्षक कवच आहेत आणि हेच विरोधकांच्या डोळय़ांत खूपत असून ते माझ्या विरोधात नवनव्या युक्त्या योजत आहेत, असे मोदी म्हणाले. या लोकांनी माझी कबर खोदण्याची शपथ घेतली असल्याचा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला. आधीची सरकारे मतपेढीच्या तुष्टीकरणात व्यग्र होती, तथापि, माझे सरकार नागरिकांना संतुष्ट करण्यात व्यग्र आहे, असेही मोदी म्हणाले.

माझ्या विरोधात कटकारस्थाने केली जात असली तरी प्रत्येक देशवासीयाने विकासावर आणि देश घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान