PM Narendra Modi Forgives Protesters: जंतर मंतरवर आंदोलनादरम्यान शिवीगाळ केलेल्या आंदोलकांना माफ केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी उशीरा रात्री प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओतून जाहीर केले. लहानपणात चुका होतात आणि लहानपणात चुकांमधून सुधारण्याची संधी देखील असते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आंदोलक मुलांनी वापरलेल्या भाषेबाबत चिंता व्यक्त करताना ही दिशा भरकटलेली मुलं असल्याचा उल्लेख केला. भरकटलेल्या मुलांना योग्य दिशा दाखविण्याचं आपलं काम असल्याचे मोदींनी या व्हिडीओत म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“जंतर मंतरवर जे झालं ते देश आणि जगानं पाहिलं आहे. काही खोडसर मुलांनी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. कोणत्याही सभ्य समाजाला न शोभणार नाहीत, अशा शब्दांचा वापर करण्यात आला. मला तर शिव्या दिल्याच पण माझ्या स्वर्गीय आईला देखील शिवीगाळ करण्यात आली. किती घाणेरडे स्वरुप होते. पण, मला आज बोलायचंय, लहानपणात चुका होतात आणि लहानपणात या चुकांमधून सुधारण्याची संधी देखील असते. आणि यालाच तर लहानपण म्हणतात”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी आंदोलकांना केलं माफ
“समाजात जो आक्रोश आहे त्याला मी व्यवस्थितपणे समजू शकतो. हा एकप्रकारचा सांस्कृतिक धक्का आहे, आमच्या मुली अशाप्रकारची भाषा कशी वापरु शकतात? पण, या मुलांना मिठीत घेऊन, योग्य रस्ता दाखविण्याची हीच वेळ आहे. ही दिशा भरकटलेली मुलं आहेत, त्यांना योग्य रस्ता दाखवणं आपलं काम आहे. त्यांना शिक्षा देणं, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं यामुळे परिस्थिती बदलणार नाही, मला त्यांना माफ करायचंय”, असे म्हणत मोदींनी आंदोलकांना माफ केल्याचे जाहीर केलं.
भरकटलेल्यांना रस्ता दाखवणं आपलं काम – पंतप्रधान मोदी
“समाजानं पण माझं हे बोलणं स्वीकारावे, कराण कधी – कधी आपल्याच दाताखाली आपली जीभ येते, रक्त येतं पण आपण दात तोडत नाही. कारण दातही आपले आणि जीभही आपलीच आहे. मुलं देखील आपलीच आहेत. त्यांनी रस्ता दाखवणं आपलं काम आहे. भरकटलेल्यांना योग्य रस्ता दाखवणं कठीण काम आहे, पण हे कठीण काम करायचं आहे”, असे पंतप्रधान मोदी संदेशात पुढे म्हणाले.
देशासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन
“माझं मुलांना देखील आवाहन आहे, या, आपण देशासाठी एकत्र मिळून पुढे जाऊया, काहीतरी नवीन शिकूया, चुकांमधून शिकूया आणि स्वप्नांना घेऊन पुढे जाऊया. देश पुढे जात आहे, अजून पुढे जाणार आहे, आणि तुमचं देखील पुढं जाणं निश्चित व्हावं हे माझं स्वप्न आहे. तुमच्यासाठी जगतोय, तुमच्या भविष्यासाठी खर्च होतोय, या आपण सगळ्यांनी मिळून देशाला पुढे घेऊन जाऊया”, असे आवाहन करताना मोदींनी, “चुकांमधून शिका आणि पुढे चला”, असा संदेश दिला.
