PM Narendra Modi Speech : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपा अशा विविध राजकीय पक्षाचे दिग्गज नेते प्रचारात उतरल्याचं दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यात सभा, रॅलींचा धडाका सुरू आहे. या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.
यातच आज पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा पार पडल्या. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. ही टीका करत असताना मोदींनी एक मोठं वक्तव्य केलं. ‘मी सर्व टीएमसी गुंडांना, टोळ्यांना आणि भ्रष्ट लोकांना एक शेवटची संधी देतो. शरण या अन्यथा ४ मे नंतर कोणीही सुटणार नाही’, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (१९ एप्रिल) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोपही मोदींनी केला. मोदी म्हणाले की, “मी सर्व टीएमसी गुंडांना, टोळ्यांना, भ्रष्ट लोकांना, सिंडिकेट्सना ही एक शेवटची संधी देतो. २९ एप्रिलपूर्वी आपापल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करा. अन्यथा ४ मे नंतर कोणीही सुटू शकणार नाही”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
Bishnupur, West Bengal: Prime Minister Narendra Modi says, "I give a final opportunity to all the criminals, all the syndicates, and all the corrupt people. Surrender yourselves at your respective police stations before April 29th… Because after May 4th, no one will be able to… pic.twitter.com/zcM0rd4zbs
— IANS (@ians_india) April 19, 2026
मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका
“पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं क्रूर सरकार १५ वर्षांपासून सत्तेवर आहे. या १५ वर्षांत तृणमूल काँग्रेसच्या कारभाराने, भीतीने आणि भ्रष्टाचाराने पश्चिम बंगालमधील प्रत्येक कुटुंबाला भयभीत केलं आहे. मात्र, दुसरीकडे याच काळात भाजपाच्या सुशासनावरील जनतेचा विश्वास अधिक वाढला आहे”, असं म्हणत मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.
‘टीएमसीच्या मंत्र्यांनी तरुणांची फसवणूक केली’ : मोदी
“तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यांनी हजारो तरुणांची फसवणूक करून शिक्षक भरतीत घोटाळा केला. टीएमसीच्या या जंगलशाहीत टक्केवारी घेतल्याशिवाय कोणतंही काम होत नाही. मग अशा परिस्थितीत राज्यात उद्योग कसे येणार? त्यामुळे या ठिकाणी उद्योगधंद्यांना मोठा फटका बसतो. कारखाने तृणमूल काँग्रेसच्या भीतीने येत नाहीत. कंपन्या विश्वासाने येत असतात. कारखाने विश्वासावर चालतात. गुंतवणूक विश्वासाने येत असते. त्यामुळे आता माझ्या राजकीय अनुभवावरून मला खात्री आहे की ४ मे नंतर भाजपाचा मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये शपथ घेईल. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान दोघेही भाजपाचे असल्याने पश्चिम बंगालचा विकास सध्याच्या गतीपेक्षा दुप्पट वेगाने होईल”, असं मोदींनी म्हटलं आहे.
ताफा थांबवला अन् मोदींनी खाल्ली १० रुपयांची झालमुडी
पंतप्रधान मोदी यांचा ताफा पश्चिम बंगालच्या झाडग्राम शहरातून जात असताना अचानक थांबला. त्यानंतर मोदी चक्क रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दुकानावर गेले आणि झालमुडीचा (तिखट भेळ) आस्वाद घेताना दिसून आले. या प्रसंगाचा व्हिडीओ पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
झाडग्राममधील एका सभेला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अचानक आपला ताफा थांबवला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्थानिक दुकानात पंतप्रधान मोदी गेले आणि त्या दुकानदाराला झालमुडी (तिखट भेळ) देण्याची विनंती केली. यावेळी तो दुकानदारही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. मोदींनी हा व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं की, “पश्चिम बंगालमधील चार सभांमधून वेळ काढून झाडग्राममध्ये स्वादिष्ट झालमुडीचा आस्वाद घेतला.”
दरम्यान, पंतप्रधान मोदींना दुकानदाराने भेळ दिल्यानंतर मोदींनी दुकानदाराला पैसे देऊ केले. मात्र, दुकानदाराने पैसे घेण्यास संकोच केला. त्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “नाही दादा असं नसतं.” त्यानंतर मोदींनी खास त्यांच्या शैलीत म्हटलं की, “त्रास घेऊ नको दादा, पैसे घे.” त्यानंतर उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
