पंतप्रधान मोदींचा सन्मान… टाइम मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश

यादीत समावेश असलेले भारतातील ठरले एकमेव नेते

टाइम मॅगझिननं २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाइम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते. या यादीत जभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना स्थान देण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त या यादीत गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्ता आणि शाहीन बाग परिसरातील आंदोलनात सामिल असलेल्या बिल्किस यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

टाइम मॅगझिनच्या यादीत जगातील निरनिराळ्या क्षेत्रातील १०० प्रभावशाली व्यक्तींना स्थान देण्यात येतं. यावेळ अनेक नेत्यांचा या यादीत समावेश आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव असे भारतीय नेते आहेत ज्यांना या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्‍साई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, कमला हॅरिस, जो बिडेन, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, टाइम मॅगझिननं मोदींबाबत मतही व्यक्त केलं आहे. “लोकशाहीसाठी सर्वात आवश्यक स्वतंत्र निवडणुकाच नाही. यामध्ये केवळ कोणाला अधिक मतं मिळाली याची माहिती मिळते. यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण त्या लोकांचा अधिकार आहे ज्यांनी विजेत्याला मत दिलं नाही. भारत गेल्या ७ दशकांपासून सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या लोकसंख्येत अनेक धर्मांच्या लोकांचा समावेश आहे,” असं टाइम मॅगझिननं म्हटलं आहे.

“भारतात अनेक वर्षांपासून शरणार्थी म्हणून वास्तव्यास असणाऱ्या दलाई लामा यांनी सद्भावना, एकोपा आणि स्थिरतेचं उदाहरण म्हणून भारताचं उदाहरण दिलं होतं. परंतु भारताबाबत असे मत असणाऱ्यांच्या मनात मोंदींनी संशय निर्माण केला. भारतात आतापर्यंतचे जवळजवळ सर्व पंतप्रधान हे देशातील सर्वाधिक म्हणजेच ८० टक्के लोकसंख्या असणाऱ्या हिंदू समाजातीलच आहेत. मात्र असं असतानाही पंतप्रधान झालेल्या मोदींनी त्यांच्यासाठी अन्य कोणीही फारसं महत्त्वाचं नाही अशापद्धतीने कारभार केला,” असं टाइम मॅगझिनचे संपादक कार्ल विक यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी हे देश सशक्त करण्याचे आश्वासन देत सत्तेत आले. परंतु ते ज्या भाजपा पक्षाचे नेतृत्व करतात तो हिंदू राष्ट्रवादाची विचारसरणी मानतो. त्यांनी केवळ उच्चवर्गालाच नाही तर बहुलवादालाही नाकारल्याचं चित्र दिसून आलं. विशेषत: भारतीय मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आलं. मतभेद निर्माण होण्यास महामारी केवळ निमित्तमात्र ठरली आणि जगातील सर्वात कार्यशील लोकशाही व्यवस्था खोल गर्त्यात अडकली, असंही विक यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm narendra modi google sundar pichai actor ayushmann khurrana top 100 people in time magazine list jud

ताज्या बातम्या