सालाबादाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी साजरी होत आहे. पण, दरवर्षीसारखा आनंद यंदा नाही. चंद्रभागेचा काठ अगदी निपचित पडला आहे. विठ्ठल मंदिर परिसरही सुनासुना आहे. असं असलं तरी प्रत्येकजण घरातूनच हात जोडून विठ्ठलाचे आशिर्वाद घेत आहे. आषाढी एकदशीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकरी परंपरेच्या इतिहासाला उजाळा दिला आहे. विशेष म्हणजे जय जय पांडुरंग हरी म्हणत पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट केलं आहे. “आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली, अशा सर्व संतांना नमन. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा.विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी रहावे, या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी”, असं ट्विट करत मोदी यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करोनाची नजर लागली

आषाढी एकदशी म्हटलं की, डोळ्यासमोर येतं गजबजलेलं पंढरपूर. वारकऱ्यांच्या अलोट गर्दीनं भरून गेलेली चंद्रभागा. आसमंतापर्यंत पोहोचणार विठ्ठलाचा गजर… पण यंदा असं काहीच नाही. लेकुरवाळ्या विठू माऊलीची भक्तांसोबतची भेट यंदा चुकली. आषाढ वारीला करोनाची नजर लागली. त्यामुळे विठ्ठलाचा जयघोष करत जाणाऱ्या ज्ञानोबा, तुकाराम महाराजांच्या पालख्याही घाईत एसटीतून विठ्ठलाच्या भेटीला गेल्या. विठ्ठल भेटीच्या ओढीला वारकऱ्यांना यंदा आवर घालावा लागला. भूवैकुंठी होणाऱ्या संत भेटीच्या सोहळ्याला हजारो वारकऱ्यांना यंदा करोनामुळे उपस्थित राहता आलं नाही.