पीटीआय, हैदराबाद

पश्चिम आशियातील संकटाची परिस्थिती पाहता पेट्रोलियम उत्पादनांचा जपून वापर करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. करोनाकाळात ज्याप्रमाणे घरून काम किंवा ऑनलाइन बैठका घेण्यात आल्या तशाच पद्धतीने काम करण्याची पुन्हा गरज असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पेट्रोलियम उत्पादनांचा वापर केवळ गरजेनुसार केला तर त्यामुळे परकीय चलनाची बचत होईलच, त्याबरोबरच युद्धाचे दुष्परिणामही कमी होतील. मात्र त्यासाठी समाजाचा सहभाग आणि जबाबदारी महत्त्वाची असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

हैदराबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणातील ९,४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. त्या वेळी त्यांनी देशाच्या ऊर्जा क्षेत्राबद्दल भाष्य केले. या वेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हेही उपस्थित होते. पश्चिम आशियात दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने तेल दरांवर त्याचा फटका बसून परकीय चलन साठ्यावर त्याचा परिणाम झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

स्वयंपाक करताना तेलाचा वापर दहा टक्के कमी केल्यास देशालाही लाभ होईल, तसेच कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील असे पंतप्रधान म्हणाले. स्वावलंबनाच्या दृष्टीने दैनंदिन वापरात परदेशी वस्तू कोणत्या आहेत त्याची यादी करा. याचा अर्थ त्या वस्तू फेकून द्या असा नव्हे, तर आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी सुचवले. स्थानिक वस्तूंना प्राधान्य द्या असे करोनाकाळात सुचवले होते याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

गेल्या काही वर्षांमध्ये भारताने सौरऊर्जेच्या क्षेत्रात आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून अभूतपूर्व काम केल्याचा दावाही त्यांनी केला. युद्ध सुरू झाल्यावर सरकारने सर्वप्रथम एलपीजी पुरवठ्यास १०० टक्के संरक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले. आता एलएनजी, सीएनजीच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रयत्नांमुळे भारत जगातील मोठ्या ऊर्जासंकटाला तोंड देत आहे, असे मोदी यांनी या वेळी सांगितले.