पीटीआय, नवी दिल्ली
‘‘कोणतीही गोष्ट विचार न करता करू नका. ती गोष्ट प्रयोगाच्या कसोटीवर तपासून पाहणे आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचे अंधानुकरण करणे गरजेचे नाही,’’ असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विद्यार्थ्यांना दिला. ज्या गोष्टी आपण विचार न करता स्वीकारतो, त्यावरही प्रश्न विचारण्याचे धाडस विद्यार्थ्यांनी दाखवावे; मात्र केवळ प्रश्न विचारून थांबू नका, तर त्यांची उत्तरे शोधण्याचेही धाडस ठेवा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
‘आयआयटी दिल्ली’च्या ५७व्या पदवीदान समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते. विद्यार्थ्यांनी आयुष्यभरातील कुतूहल आणि शिकण्याची वृत्ती जिवंत ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला. वेगाने बदलणार्या तंत्रज्ञानामुळे जगाच्या राजकीय आणि सामरिक परिस्थितीतही मोठे बदल होत आहेत. अशा काळात सतत शिकत राहणारा व्यक्तीच यशस्वी होईल, असे मोदी म्हणाले. आव्हानांवर नवे उपाय शोधण्याचे धाडस असेल तर तीच आव्हाने संधी बनतात, असेही त्यांनी सांगितले.
आयआयटीची पदवी म्हणजे केवळ चांगले गुण किंवा आकर्षक नोकरीचे पॅकेज मिळवण्याचे साधन नाही. ही पदवी विद्याथ्र्याला अवघड समस्या सोडवता येतात, याची जगाला मिळालेली प्रमाणपत्रासारखी खात्री आहे, असे मोदी यांनी सांगितले. महाविद्यालयातील परीक्षांप्रमाणे आयुष्यातील आव्हाने ‘अभ्यासक्रमाबाहेरची’ असतील. त्यामुळे आधीच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा समाजाने प्रश्न मानणेच बंद केलेल्या समस्यांना प्रश्न म्हणून ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवरील अनावश्यक स्पर्धेपासून दूर राहावे, असा सल्लाही मोदी यांनी दिला. मित्रांचे पगार, नोकर्या, स्टार्टअप किंवा मिळालेले यश यांच्याशी स्वत:ची तुलना करू नका. आयुष्य हे कोणतेही ‘लीडरबोर्ड’ नाही; तुमची खरी शर्यत दुसर्या कोणाशी नसून स्वत:शी आहे, असे ते म्हणाले. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देत स्वत:मध्ये सुधारणा करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
पदवीदान समारंभात पदके आणि पुरस्कार मिळवणार्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मोदी यांनी मुलींच्या कमी सहभागाकडे लक्ष वेधले. पदकविजेत्यांमध्ये एक-दोन मुली असत्या तर आणखी चांगले झाले असते; केवळ एक-दोन नव्हे, तर अशा अनेक मुली असायला हव्यात, असे ते म्हणाले.
आत्मनिर्भरतेचा पाया तरुणांमध्ये
देश आर्थिक, तांत्रिक आणि औद्योगिक अशा सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्नशील असून हा ‘विकसित भारता’चा भक्कम पाया आहे, असे मोदी यांनी सांगितले. अंतराळ क्षेत्रातील वेगवान विस्तार, देशांतर्गत सेमीकंडक्टर निर्मिती, स्टार्टअप क्षेत्रातील वाढ, डिजिटल व्यवहार आणि फिनटेकमुळे तरुणांना नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ‘भारतात चिप तयार करणारा माझ्या घराण्यातील पहिला व्यक्ती’ असे अभिमानाने सांगणारा तरुण आज दिसत आहे, असे मोदी म्हणाले.
‘वन नेशन, वन सब्क्रिरप्शन’चा उल्लेख
देशातील विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना दर्जेदार संशोधन साहित्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी ‘वन नेशन, वन सब्क्रिरप्शन’ योजना सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून जागतिक दर्जाची संशोधन नियतकालिके देशातील लहान शहरांमधील विद्यार्थ्यांनाही कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मिळू शकतात.
देशासाठी योगदान देण्याची जबाबदारी
– विद्यार्थ्यांच्या पदवीचा अर्थ देशासाठी योगदान देण्याची जबाबदारी असा असल्याचे मोदी यांनी सांगितले.
– मागील पिढीसमोर स्वातंत्र्य मिळवण्याचे एकच मोठे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी त्याग आणि तपश्चर्या केली.
– पुढील ३० वर्षांत देशाच्या विकासाच्या उद्दिष्टांशी आपल्या करिअरचा संबंध जोडून आजच्या पिढीने स्वत:चा वारसा निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.
– प्रत्येक निर्णय घेताना त्यातून देशाला काय फायदा होईल आणि देशाची कोणती गरज पूर्ण होईल, याचा विचार करा, असे त्यांनी सांगितले.
