“…तो दिवस मी कायम लक्षात ठेवेन”, पंतप्रधानांनी दिला सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा!

नौशेरामध्ये जवानांशी बोलताना पंतप्रधानांनी जागवल्या सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणी! नौशेरामधील जवानांच्या शौर्याचं केलं कौतुक!

pm narenedra modi in naushera
नौशेरामध्ये जवानांशी बोलताना पंतप्रधानांनी जागवल्या सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरच्या नौशेरा या सीमावर्ती भागाच्या दौऱ्यावर आहेत. दरवर्षीप्रमाणे सीमेवर तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान नौशेरामध्ये आहेत. या वेळी पंतप्रधानांनी तिथल्या जवानांशी संवाद साधला. नौशेरामध्ये तैनात जवानांच्या शौर्याचं वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा दिला. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सीमेत घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. यावेळी नौशेराच्या जवानांनी गाजवलेल्या मर्दुमकीचं पंतप्रधानांनी कौतुक केलं.

“प्रत्येक भारतीयाला गर्व वाटणारी भूमिका”

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौशेरा सेक्टरमध्ये तैनात जवानांच्या कौशल्याचं कौतुक केलं. “सर्जिकल स्ट्राईकमध्ये इथल्या ब्रिगेडनं जी भूमिका निभावली, ती प्रत्येक भारतीयाला गर्व वाटणारी आहे”, असं ते म्हणाले. “सर्जिकल स्ट्राईकनंतर इथे अशांती निर्माण करण्याचे अनेक कुत्सित प्रयत्न झाले, आजही होतात. पण प्रत्येक वेळी इथे तोडीस तोड उत्तर दिलं जातं. असत्याविरुद्ध या मातीत एक स्वाभाविक प्रेरणा आहे. असं म्हणतात, की पांडवांनीही अज्ञातवासाच्या दरम्यान आपला काही काळ इथे घालवला होता”, असं पंतप्रधान म्हणाले.

“मी प्रत्येक क्षण फोनची वाट पाहात होतो”

दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईकच्या दिवशीच्या आठवणींना उजाळा दिला. “तो दिवस कायम माझ्या लक्षात राहील. मी ठरवलं होतं की सूर्यास्तापूर्वी सर्वजण परत यायला हवेत. मी प्रत्येक क्षण फोन वाजण्याची वाट पाहात होतो. माझा शेवटचा जवान पोहोचला का हे पाहात होतो. आणि आपलं कोणतंही नुकसान न होता आपले जवान यश मिळवून परत आले”, असं पंतप्रधान म्हणाले.

“भारतीय सैन्याची ताकद काय आहे, याचा अंदाज शत्रूला…”, नरेंद्र मोदींचा नौशेरातला सेक्टरमधील जवानांसोबत संवाद!

काँग्रेसवरही अप्रत्यक्ष निशाणा!

“दुर्दैवाने सैन्याच्या बाबतीत देशात हे मानलं गेलं होतं की आपल्याला जे काही मिळेल, ते विदेशातूनच मिळणार आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्याला झुकावं लागत होतं. जास्त पैसे खर्च करावे लागत होते. नवी शस्त्रास्त्रे खरेदी करण्याची प्रक्रिया वर्षानुवर्ष सुरू असायची. एक अधिकारी प्रक्रिया सुरू करायचा, पण तो निवृत्त होईपर्यंत ती पूर्णच होत नव्हती. परिणामी जेव्हा गरज पडायची, तेव्हा शस्त्रास्त्र घाईगडबडीत खरेदी होत होती. अगदी सुट्या भागांसाठीही आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून असायचो. पण आता संरक्षण क्षेत्रातल्या स्वावलंबनाचा संकल्प त्या परिस्थितीवर मात करण्याचा मार्ग आहे. देशाच्या उत्पन्नाचा ६५ टक्के हिस्सा देशांतर्गत उत्पादित गोष्टींवर खर्च होतोय”, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर देखील अप्रत्यक्ष शब्दांमध्ये निशाणा साधला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm narendra modi in naushera on surgical strike by indian military after uri pmw

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या