PM Narendra Modi Telangana Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणा राज्यात १३,५०० कोटी रुपयांच्या अनेक विकास कामांचे उद्घाटन केले. तसेच पंतप्रधान मोदींनी नागपूर-विजयवाडा या इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक भाग असलेल्या रस्ते प्रकल्पांची देखील पायाभरणी केली. या रस्ते प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग 163G च्या वारंगल ते खम्ममपर्यंत १०८ किमी लांबीचा चौपदरी ग्रीनफिल्ड महामार्ग आणि खम्मम ते विजयवाडापर्यंत ९० किमीच्या चौपदरी ग्रीन फिल्ड महामार्गाचा समावेश करण्यात आला आहे.

वारंगल ते खम्मम आणि खम्मम ते विजयवाडा हे दोन्ही प्रकल्प सुमारे ६,४०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 163G वरील वारंगल ते खम्ममपर्यंत असणारा १०८ किमीचा ग्रीन फिल्ड या चौपदरी महामार्गामुळे या ठिकाणांमधील अंतर सुमारे १४ किमीने कमी होईल. तर खम्मम ते विजयवाडापर्यंत असलेल्या चौपदरी ग्रीन फिल्ड महामार्गमद्वारे या दोन ठिकाणांमधील अंतर सुमारे २७ किमीने कमी करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : VIDEO: २६/११चा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या साथीदाराची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या

खम्मम जिल्हा आणि आंध्र प्रदेशमधील किनारी भागांमध्ये चांगल्या प्रकारची दळणवळण यंत्रणा तयार करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय महामार्ग 365 BB च्या ५९ किमी लांबीच्या सूर्यपेट ते खम्ममपर्यंतच्या चौपदरीकरणासाठी एका रस्ते प्रकल्पाची देखील घोषणा यावेळी केली. या प्रकल्पासाठी सुमारे २,४६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा चौपदरीकरणाचा प्रकल्प हैदराबाद -विशाखापट्टणम कॉरिडॉरचा एक भाग आहे. जो भारतमाला परियोजनेअंतर्गत विकसित केला जात आहे.

१३,५०० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”मला आनंद आहे की मी आज अशा अनेक रस्ते कनेक्टिव्हीटी प्रकल्पांचे शिलान्यास आणि लोकार्पण केले आहे. ज्यामुळे येथील लोकांच्या जीवनात खूप मोठे बदल होणार आहेत. नागपूर-विजयवाडा कॉरिडॉरच्या माध्यमातून तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये दळणवळण खूप सोपे होणार आहे. या कॉरिडॉरमुळे या तीनही राज्यांमध्ये व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.”

जक्लेर (Jaklair) ते कृष्णा दरम्यान तयार करण्यात आलेला ३७ किमीचा रेल्वेमार्गाचे देखील उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले. नारायणपेट जिल्ह्यामध्ये चांगली दळणवण सुविधा तयार करण्यासाठी हा रेल्वेमार्ग ५०० कोटींपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कृष्णा स्टेशनवरून हैदराबाद (काचेगुडा) – रायचूर-हैदराबाद (काचेगुडा) रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. हैदराबाद (काचेगुडा)-रायचूर-हैदराबाद (काचेगुडा) रेल्वे तेलंगणा राज्यातील हैदराबाद, रंगारेड्डी, महबूबनगर आणि नारायणपेट जिल्ह्यांना कर्नाटकातील रायचूरशी जोडणार आहे. ही रेल्वे सेवा महबूबनगर आणि नारायणपेट जिल्ह्यातील अनेक भागांना पहिल्यांदाच रेल्वे कनेक्टिव्हीटी प्रदान करणार आहे.

हेही वाचा : JNU च्या भिंतींवर ‘भगवा जलेगा’, ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा, वातावरण तापल्यानंतर तपास सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांसह सुमारे २,१७० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या हसन-चेरापल्ली LPG पाइपलाइन प्रकल्पाचेही उद्घाटन केले. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (BPCL) च्या कृष्णपट्टणम ते हैदराबाद या ४२५ किमीच्या पेट्रोलियम पाइपलाइनची पायाभरणी देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी केली. या पाइपलाइनचा प्रकल्प सुमारे १,९४० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रकल्पांसह हैदराबाद विद्यापीठाच्या पाच नवीन इमारतींचे देखील उदघाटन केले. स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स-III आणि सरोजिनी नायडू स्कूल ऑफ आर्ट्स अँड कम्युनिकेशन या नावाने पाच इमारती ओळखल्या जाणार आहेत.

Story img Loader